एकाच छताखाली विविध योजनांची माहिती; मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
धाराशिव, दिनांक 14 (विमाका) : केंद्र, राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे कोटला मैदानावर विविध शासकीय विभागांची दालने एकाच छताखाली उभारण्यात आली. दालनाच्या माध्यमातून अनेक योजनांची माहिती नागरिकांनी या ठिकाणी जाणून घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या दालनांमधून महिला व बालविकास, शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जल जीवन मिशन आदी विभागाच्या विविध योजना, उपक्रमांची माहिती संबंधित नागरिकांना अधिकारी, कर्मचारी यांनी दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुलींना मोफत उच्च शिक्षण, पोषण अभियान, पूरक पोषण आहार, लेक लाडकी आदी योजनांसह विविध योजनांची दालनांमध्ये माहिती देऊन नागरिकांमध्ये योजनांबाबत जागृती करण्यात आली.
महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्याकडून नमो महिला सशक्तीकरण अभियान, गट निर्मिती, फिरता निधी, अर्थसहाय्य, प्रशिक्षण आदींबाबत माहिती देण्यात आली. जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने महिलांना उद्योग उभारणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तर माझी शाळा सुंदर शाळा, माझी शाळा माझी परस बाग, आनंददायी शिक्षण, आकांक्षित तालुका असलेल्या परंडा तालुक्याबाबत शिक्षण विभागाच्यावतीने ठरवलेल्या उद्दिष्टांची जागृतीही या ठिकाणी प्रात्यक्षिकांसह करण्यात आली.
**