जनसामान्यांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास वृद्धिंगत करण्यात वकिलांची भूमिका महत्त्वाची – न्यायमूर्ती संजीव खन्ना

0
85

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ पदवीदान सोहळा

छत्रपती संभाजीनगर, दि.१६(जिमाका) – वकिल हा एक कायदेविषयक कौशल्य व जबाबदारीचे भान असणारा व्यक्ति असतो. समाजाच्या भल्यासाठी, जनसामान्यांमध्ये कायदेविषयक भान जागवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असतो. त्यामुळेच जनसामान्यांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास वृद्धिंगत करण्यात वकिलांची भूमिका महत्त्वाची असते,असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज येथे केले.

            येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा तिसरा पदवीदान सोहळा आज उत्साहात पार पडला. या सोहळ्यास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा विद्यापीठाचे कुलपती अभय ओक हे होते. या सोहळ्यास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा विद्यापीठ अधिसभेचे सदस्य उज्जल भूयान, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रविंद घुगे, न्यायमूर्ती मंगेश पाटील, महाराष्ट्र बार कॉन्सिलचे अध्यक्ष ॲड संग्राम देसाई, कुलगुरु प्रा. ए. लक्ष्मीनाथ, कुलसचिव प्रा. डॉ. धनाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

या पदवीदान सोहळ्यात विधी पदवी व पदव्युत्तर अशा पदव्यांचे ११३ स्नातकांना पदवीदान करण्यात आले. त्याचप्रमाणे सुवर्णपदकाच्या मानकरी ठरलेल्या स्नातकांना सुवर्णपदके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

आपल्या संबोधनात न्या. खन्ना म्हणाले की, विधी पदवीधर झाल्यावर न्यायव्यवस्थेशी थेट संबंधित होता येते. न्यायव्यवस्थेबद्दल समाजामध्ये असणारा विश्वास जपण्याची व तो वृद्धिंगत करण्याची आपणावर जबाबदारी असते. लोकांमध्ये कायद्याबद्दल जनजागृती करुन त्यांच्या न्याय्य हक्काविषयी जागरुक करणे ही देखील आपली जबाबदारी होय. उपस्थित स्नातकांना मार्गदर्शन करतांना न्या. खन्ना म्हणाले की, वकिलीच्या क्षेत्रात अमर्याद संधी आहेत. वकिलीत तंत्रज्ञानाचा वापर करणे ही सुद्धा काळाची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) मुळे ही शक्यता अधिक वाढली असून त्यामुळे वकिलांचे काम तंत्रस्नेही होईल. माहिती,तत्थ्यांचे संकलन व त्याचे पृथ्थकरण करुन वकिलांनी जनसामान्यांना न्यायप्रणालीविषयक सेवा देणे आवश्यक आहे.

न्या. खन्ना पुढे म्हणाले की, कायदेविषयक जनजागृती, प्रतिनिधित्व तसेच सल्ला व सहकार्य या त्रिसुत्रीवर आपण लोकांना विधीविषयक सेवा देऊन त्यांचा न्याय प्रणालीवरील विश्वास अधिक दृढ करु शकता. त्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाद्वारे अनेक सेवा देण्यात येतात. त्यात आपण आपले योगदान देऊ शकता. याशिवाय काही विधी स्वयंसेवकांचीही या कार्यासाठी आवश्यकता असेल. समाजातील विविध घटकांमधून आपण अशा स्वयंसेवकांची सेवा मिळवू शकतो. एकंदर विधी क्षेत्रात अनेक संधी असून त्याद्वारे न्यायव्यवस्थेचे घटक म्हणून आपण काम करावे,असा सल्ला त्यांनी स्नातकांना दिला.

स्वागतपर भाषण कुलगुरु प्रा. ए. लक्ष्मीनाथ यांनी केले तर कुलसचिव प्रा. डॉ. धनाजी जाधव यांनी आभार मानले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.

०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here