सर्वांना सुख, शांती मिळू दे, सगळीकडे समाधानाचे वातावरण निर्माण होऊ दे – उपमुख्यमंत्र्यांचे गणरायाला साकडे

0
101

मानाच्या गणपतींचे पूजन करून विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ

पुणे, दि. १७: सर्वांना सुख, शांती, आनंद मिळू दे, सगळीकडे समाधानाचे वातावरण निर्माण होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी गणरायाच्या चरणी घातले. शहरातील विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ करताना ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…!’ असा घोष करून भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.

श्री. पवार यांनी महात्मा फुले मंडई परिसरात पुण्यातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालिम मंडळ, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळ केसरीवाडा या मानाच्या पाच गणपतीचे पूजन करुन दर्शन घेतले. त्यानंतर या मंडळाच्यावतीने विसर्जन मिरवणुकीस सुरु करण्यात आली.

यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार सुनेत्रा पवार, आमदार रवींद्र धंगेकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी श्री. पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ आणि अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाला भेटी देऊन श्री गणेशाची आरती करुन दर्शन घेतले.

श्री. पवार म्हणाले, देशासह राज्यात मोठ्या उत्सवात भक्तीमय वातावरणात गणरायाचे आगमन झाले आणि त्याचे स्वागत झाले. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची एक मोठी परंपरा असून मोठा नावलौकिक आहे. गणेशोत्सवात सर्व जातीधर्माचे नागरिक सहभागी होतात, याला साजेसे काम पुणेकरांनी करावं, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, हे पाहता आजच दुपारी ४ वाजेपर्यंत श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याच्या निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने घेतला आहे, यामुळे नागरिक आणि प्रशासनावरील ताण कमी होतो, असे नवनवीन पायंडे पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून पाडण्यात येत असतात, ही चांगली बाब आहे.

राज्यात कायदा सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील असते. सण, उत्सवाच्या काळात प्रशासनाच्यावतीने करण्यात नियमांचे पालन करुन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले.

यावेळी कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विकास पवार आणि लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळाचे उत्सवप्रमुख डॉ. रोहित टिळक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीराचे अध्यक्ष माणिक चव्हाण, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्यासह विविध मंडळाचे विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित होते.

तत्पूर्वी महात्मा फुले मंडई परिसरातील लोकमान्य टिळक आणि उप पंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास श्री. पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here