विसरवाडी येथे १८ महिला बचत गटांना मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते शेळी गटांचे वितरण

नंदुरबार, दिनांक 18 सप्टेंबर, 2024 (जिमाका वृत्त) : आदिवासी विकास विभागाच्या विशेष सहाय्य योजनेंतर्गत निवड झालेल्या महिला 18 बचत गटांना शेळी गट वितरणाचा कार्यक्रम आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमास नवापूर चे माजी आमदार शरद गावित, जिल्हा परिषद सदस्य सुनिल गावित, नवापूर पं.स.चे माजी सभापती विनायक गावित, संदिप अग्रवाल, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संजय काकडे, प्रकाश वसावे, शिक्षण विकास अधिकारी ज्ञानेश्वर माळी, विजय सोनार यांच्यासह बचत गटांचे प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येंन उपस्थित होते.

आदिवासी समुदायातील लोक हे प्रामुख्याने दुर्गम भागात राहत असल्याने त्यांच्याकडील जमीन उंचसखल, डोंगराळ हलक्या प्रतीची खडकाळ स्वरूपाची असते, त्या जमीनीत येणारे उत्पन्नाचे प्रमाण कमी असते, योग्य प्रमाणात पाऊस न झाल्यास त्यांच्या उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम होतो. परिणामी त्यांना रोजगाराच्या शोधात कुंटूंबासह स्थलांतर करावे लागते. बचत गटांना शेळी गट वितरण योजनेअंतर्गत शेतीस पुरक व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसायासाठी दहा शेळ्या व एक बोकड पुरविल्यास शेतकऱ्यांच्या कुटूंबांना आर्थिक फायदा होईल व त्यांचे होणारे स्थलांतराचे प्रमाण काही अंशी कमी होऊन त्यांचे
जीवनमान उंचावेल, हा योजना राबविण्याचा मुख्य उददेश असल्याचे यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले. तसेच त्यांनी जिल्हा विकासासाठी ज्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे त्याबाबतही उपस्थितींना माहिती दिली.

यावेळी माजी आमदार शरद गावित यांनीही मनोगत व्यक्त केले. विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत महिला बचत गटांना शेळी गट पुरवठा करण्याची योजना मंजूर होती. योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार प्रती महिला बचत गट रूपये. 1,03,545/- मात्र प्रमाणे मंजूर आहेत. नंदुरबार प्रकल्प कार्यालयासाठी 129 चा लक्षांक निश्चित करून देण्यात आला. त्यानुसार नंदुरबार-12 गट, नवापूर-103 गटांचा उद्दिष्ट असल्याचे नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

00000