मुंबई दि. २३ :- अहमदनगर जिल्ह्यातील मौजे चिकणी येथील जमीन हस्तांतरण व्यवहार बेकायदेशीर असून याप्रकरणी गुन्हे नोंद करण्यात यावेत तसेच या जमीन नोंदणीची निर्गमित झालेली सूचना नियमबाह्य असल्याने रद्द करण्याची कार्यवाही केली जावी, अशा सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिल्या.
मंत्रालयात मौजे चिकणी येथील जमीन व्यवहार नोंदणीच्या अनुषंगाने महसूल पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, वन विभागाचे प्रधान सचिव एच गोविंदराज उपस्थित होते. तसेच अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे सहभागी झाले होते.
मौजे चिकणी ता. संगमनेर येथील गट क्र. ३८०/१ मधील ७९.९७ हे. आर क्षेत्र मुळ सभासदांच्या नावावर करणेबाबत जमीन नोंदणी व विक्री व्यवहार प्रकरणी आजच्या आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली.
यापूर्वी पुणे जिल्ह्यात देखील असे व्यवहार समोर आल्याने गुन्हे नोंद करण्याची कार्यवाही झाली आहे. जमीन नोंदणी करण्यासाठी सादर करण्यात आलेले सातबारे प्रमाणपत्र हे बोगस असल्याचे निदर्शनास आले आहे, जमीन नोंदणीच्या अनुषंगाने सूचना जारी करण्यात आली होती. या अनुषंगाने वनविभागाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.
बैठकीस महसूल व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बैठकीत मौजे कऱ्हे ता. संगमनेर येथील क्षेत्राच्या हस्तांतरणाबाबत चर्चा झाली.
0000
किरण वाघ/विसंअ/