०१ ऑक्टोबर – ऐच्छिक रक्तदान दिन

 ऐच्छिक रक्तदान मोहिमेला यावर्षी २० वर्षे पूर्ण...२० वर्षाच्या रक्तदानाच्या महान कार्याचा उत्सव..रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार..

एकविसाव्या शतकात मानवाने आजपर्यंत विज्ञान, आरोग्य, शेती तंत्रज्ञान,औद्योगिक, आधुनिक तंत्रज्ञान, इ.आदी क्षेत्रात भरपूर प्रगती केली आहे. मात्र मानवी रक्ताला दुसरा पर्याय शोधण्यात आजपर्यंत मानवाला अथवा विज्ञानाला यश मिळाले नाही. यासाठी माणसाचा जीव वाचविण्यासाठी माणसाचेच रक्त लागते.   यासाठी रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे.  रक्तदान जनजागृतीपर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राष्ट्रीय रक्त संक्रमण  परिषद,राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था, महाराष्ट्र शासन, राज्य रक्त संक्रमण परिषद,म.रा.ए.नि.सं. तसेच वेगवेगळ्या सामाजिक संस्था,औद्योगिक क्षेत्र, महाविद्यालय (एन.एस.एस.आणिएन.सी.सी) आदिंच्या माध्यमातून ऐच्छिक रक्तदान मोहीम जनजागृतीपर यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे.

या वर्षाचे शासनाचे घोषवाक्य आहे,”Celebrating 20 years of giving : THANK YOU BLOOD DONORS !”

( 20 वर्षाच्या रक्तदानाच्या महान कार्याचा उत्सव”….रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार …..!)

ऐच्छिक रक्तदान मोहिमेला यावर्षी 20 वर्षे होत असून यासाठी सर्वात मोठे योगदान स्वैच्छिक रक्तदात्यांचे आहे. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस साजरा होत आहे. राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिवस सर्वप्रथम 01 ऑक्टोबर 1975 या दिवशीइंडियन सोसायटी आँफ ब्लड ट्रान्सफ्यूजन अँण्ड इम्यूनो हिमँटोलाँजी या संस्थेच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन अँण्ड इम्यूनो हिमँटोलाँजी या संस्थेची स्थापना 22 ऑक्टोबर 1971 या दिवशी के.स्वरुप क्रिशेन आणि डॉ.जे.जी. ज्वाली यांनी केली.   जागतिक आरोग्य संघटना, रेडक्रास आणि रेड क्रेसेंट सोसायटीच, इंटरनँशनल फेडरेशन आँफ ब्लड डोनर आँर्गनायझेशन आणि इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन यांनी सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादकांच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि स्वैच्छिक रक्तदान करून रक्तदान महायज्ञात रुग्णांचे प्राण  वाचविणाऱ्या ‘ऐच्छिक रक्तदाता’ म्हणून या मोहिमेत सामील झालेल्या रक्तदात्यांचे आभार मानले पाहिजे.

हा कार्यक्रम प्रथमच 2004 मध्ये चार प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्थाव्दारे आयोजित करण्यात आला होता. याला यावर्षी 20 वर्षे पूर्ण होत आहे.

ऐच्छिक रक्तदान…वाचवी रुग्णांचे प्राण  :- युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती असल्याने युवा वर्गाने या मोहिमेत सहभागी होऊन रुग्णांचे प्राण वाचवू शकता. आपल्या ऐच्छिक रक्तदानाने  एखाद्या रुग्णांचे प्राण वाचविण्यास फायदा होतो. रक्तदानाने थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल, ल्युकेमिया इ.अशा रुग्णांना नेहमी रक्ताची गरज भासते. अतिदक्षता, प्रसुती, अपघात, रक्तक्षय, अतिरक्तस्राव इ.आदी अशा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी तातडीने रक्ताची आवश्यकता असते.

गरजूंना रक्त पुरवठा झाल्याचे समाधान मिळते. शरीरातील रक्तदाब,कोलेस्टेारॉलचे प्रमाण योग्य नियंत्रण  राहते. समाजाचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानामुळे मिळते. नेहमी शासन मान्यता प्राप्त रक्तपेढीत/रक्तकेंद्रात अथवा आयोजित  रक्तदान शिबिरात  रक्तदान करणार. हा माझा संकल्प. बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची क्षमता वाढते. रक्तदान केल्यानंतर 24 तास ते 7 दिवसात नैसर्गिकरित्या रक्ताची झिज भरून निघते. रक्तदान केल्यानंतर नवीन पेशी तयार होण्यासाठी नवचेतना निर्माण होते. रक्तदान प्रक्रियेत रक्तदानाची सुरक्षितता याचे काटेकोरपणे पालन केले जाते. त्यामुळे कोणतेही इजा किंवा आजार होण्याची शक्यता नसते. समाजाचा एक जबाबदार नागरिक म्हणून निःस्वार्थीपणे,समाजहितासाठी, राष्ट्रसेवा म्हणून रक्तदान महत्त्वाचे. ऐच्छिक रक्तदाता म्हणून व्हॉट्सअप ग्रुप, सोशल मीडिया, डिजिटल माध्यमातून रक्तदान शिबीर तसेच रक्तदाता नोंदणी संपर्क अभियान राबवून रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मदत होऊ शकते. रक्तदान अभियान राबविण्यात येणाऱ्या आरोग्य सेतू पोर्टल https://eraktkosh.mohfw.gov.in/ या वेबसाईटवर रजिस्टर नोंदणी करून ऐच्छिक रक्तदान करुन रक्तदानाबद्दल ऑनलाईन रक्तदान प्रमाण पत्र देता येते.

या रक्तदान मोहिमेत आपणही सहभागी होऊन आपण रुग्णांचे प्राण वाचविण्याचे पवित्र काम करु शकता.

अनेक सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था आणि सामान्य माणसांनीही रक्तदानासाठी मोठ्या प्रमाणावर पुढे यायला हवे. त्यामुळेच देशात आवश्यक तेवढा रक्तसाठा उपलब्ध होईल”. रक्तदान हे महान कार्य आहे तसेच मानवी रक्ताची गरज कधीही न संपणारी असल्यामुळे रक्तदानाविषयी प्रेरणा समाजात द्दढ करणे, निरोगी रक्तदात्यांची फौज उभी  करून रक्तदात्यांमध्ये ऐच्छिक रक्तदानाविषयी जनजागृती करणे, सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदात्यांविषयी कृतज्ञता निर्माण व्हावी, या मागचा एवढाच उद्देश.

हेमकांत सोनार, रक्तपेढी तंत्रज्ञ,जिल्हा रुग्णालय, अलिबाग-रायगड.