नंदुरबार, दिनांक 03 (जिमाका वृत्त) : राज्यात आवश्यकतेनुसार आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतीगृह, आश्रमशाळा, शाळा यांना स्वमालकीच्या इमारतींसाठी 100 टक्के मंजूरी देण्यात आली असून त्यात नंदुरबार जिल्ह्यातील इमारतींना मोठ्या प्रमाणावर मंजुरी देण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या 7 ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व इमारतींचे भूमिपूजन ऑनलाईन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.
ते काल जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत एकलव्य गॉडेल रेसिडेशीअल स्कूल, (रोषमाळ, ता. धडगाव) येथील संकुलात मुलांचे वसतिगृह, भोजन कक्ष, प्राचार्य निवासस्थान, शिक्षक व कर्मचारी टाईप 2 व टाईप 3 गृहपाल निवासस्थान (मुले /मुली), अतिथीगृह, क्रिडासुविधा, डिप बोअरिंग, पंप रूम. संरक्षण मित, अंतर्गत रस्ते. प्रवेश व्दार, ध्वजारोहन स्टेज इ. भूमीपुजन समारंभ, तसेच शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह, (मोलगी, ता. अक्कलकुवा) येथील मुलींचे वसतिगृह इमारतींच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, आमदार आमश्या पाडवी, माजी खासदार डॉ. हिना गावित, जि.प. सदस्य रूपसिंग तडवी, सरपंच ज्योती तडवी (मोलगी), दिलीप वसावे (सरी), आकाश वसावे (डाब), सहाय्यक प्रकल्प अधिकारी उत्तम राऊत, प्रभात गायकवाड यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, ज्या शाळांना प्रशस्त जागा आहेत, तेथे खेळाची मैदाने निर्माण करून क्रिडापटूंना प्रोत्साहन देण्याचा आदिवासी विकास विभागाचा प्रयत्न आहे. ज्या शाळा, आश्रमशाळा, वसतीगृह यांच्याकडे जमीन उपलब्ध आहे, तेथे स्वमालकीच्या इमारती मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यात एकट्या तळोदा प्रकल्पातील धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील 34 इमारतींचा समावेश आहे. दुर्गम-अतिदुर्गम भागात शिस्तबद्ध शिक्षणाच्या दर्जेदार सुविधा निर्माण झाल्या पाहिजे यासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच येणाऱ्या दोन ते सहा महिन्यांत सर्व शासकीय आश्रमशाळा, वसतीगृहांमध्ये आपल्याला बायोमॅट्रीक प्रणाली स्थापित झालेल्या दिसून येणार आहेत.
ते पुढे म्हणाले, प्रत्येक गावात देवालये आहेत आणि त्या देवीलयांमधून रोज भजनी मंडळाचे कार्यक्रम होत असतात, या सर्व भजनी मंडळांना कुठलाही भेदभाव न करता भजनाचे साहित्य जिल्ह्यात वितरीत करण्यात आले आहे. तसेच गावातील नवतरूणाईत असलेली क्रिकेट खेळाची गोडी लक्षात घेता प्रत्येक गावाला क्रिकेट साहित्याचे वितरण आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच बचतगटांच्या सक्षमीकरणातून गाई व बकरी पालनालाही प्रोत्साहन दिले जात आहे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, आमदार आमश्या पाडवी, माजी खासदार डॉ. हिना गावित यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.