परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर – उद्योगमंत्री उदय सामंत

नाशिक येथे एमआयडीसीच्या माध्यमातून ‘महाराष्ट्राची उद्योग भरारी’ कार्यक्रम

0
84

नाशिक, दि. 3 सप्टेंबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासन औद्योगिक विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. उद्योगांना पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यात येत आहेत. गेल्या तीन महिन्यांत 75 हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली असून राज्य परकीय गुंतवणुकीत प्रथम क्रमांकावर आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.

उद्योग विभागातर्फे येथील हॉटेल डेमोक्रॅसी येथे आज सकाळी ‘उद्यमात सकल समृद्धी- महाराष्ट्राची उद्योग भरारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्योग मंत्री श्री. सामंत बोलत होते. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरे, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, उद्योजक धनंजय बेळे, संदीप सोनवणे, कांतिलाल चोपडा, अजय बोरस्ते, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळे, सहसंचालक श्री. शेळके, कार्यकारी अभियंता श्री. पवार, व्यवस्थापक अतुल दवंगे आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना धनादेश आणि नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले.

मंत्री श्री. सामंत म्हणाले, औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन कटिबध्द आहे. पायाभूत सोयीसुविधा निर्मितीची प्रक्रिया जलदगतीने सुरू आहे. त्याच अनुषंगाने विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. अंबड औद्योगिक क्षेत्रात सांडपाणी व्यवस्थापनासाठी 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नाशिक औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल.

गडचिरोली जिल्ह्यास स्टील हब म्हणून विकसित करण्यात येत आहेत. त्यातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होत असून त्यातून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. आगामी काळात नाशिक जिल्ह्यात लवकरच मोठा प्रकल्प येईल, असेही त्यांनी सांगितले. कृषीवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत असून मोठ्या उद्योजकांबरोबरच लघु उद्योगांनाही कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश बँकांना दिले आहेत. राज्यातून कोणताही उद्योग बाहेर गेलेला नाही. नवी मुंबईतील महापे येथे जेम्स ऍण्ड ज्वेलरी पार्क साकारण्यात येणार आहे.

खासदार श्री. वाजे म्हणाले, राज्याने औद्योगिक क्षेत्रात घेतलेली भरारी आनंदाची बाब आहे. उद्योग क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी विविध उपाययोजना होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. श्री. गांधी म्हणाले, गेल्या दोन वर्षात राज्याने पुन्हा औद्योगिक क्षेत्रात भरारी घेतली आहे. नवनवीन उद्योग आले आहेत. उद्योगांचे सक्षमीकरण होत आहे. नवीन औद्योगिक क्षेत्र विकसित होत आहेत. ही समाधानाची बाब आहे. उद्योजकांना सन्मान मिळवून देण्याचे काम शासनाने केले आहे. श्री. बेळे म्हणाले, औद्योगिक क्षेत्रात राज्य अग्रेसर आहे. शासनाकडून उद्योजकांना सकारात्मक प्रतिसाद आणि प्रोत्साहन मिळत आहे.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मुळे यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, उद्योग भरारी या उपक्रमाची संकल्पना मंत्री श्री. सामंत यांची आहे. राज्याने उद्योग क्षेत्रात भरारी घेतली आहे. नाशिक उद्योग क्षेत्रात अग्रेसर आहे. त्यांना या उपक्रमाचा लाभ होईल, असेही त्यांनी सांगितले. प्रादेशिक अधिकारी श्री. गवळे यांनी आभार मानले. यावेळी विविध क्षेत्रातील उद्योजक, औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here