माझी ‘अभिजात’ मराठी

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अधिकृतपणे प्राप्त झाला याचा सर्वच मराठी भाषिकांना अभिमान आहे. याचा संदर्भ थेट बीड सोबत असल्याचा विशेष आनंद समस्त बीडवासियांना आहे. याच बीडच्या भूमीत आद्यकवी मुकुंदराज यांनी शके १११०  मध्ये पहिला मराठी ग्रंथ विवेकसिंधू लिहिला.

मराठी भाषा ही मूळची आर्यांची भाषा मानली जाते. भाषेचा उगम उत्तरेकडे झाला असला तरी ही भाषा सातपुडा पर्वतरांगांपासून खाली कावेरी नदीच्या खोऱ्यापर्यंत विस्तारली व स्थिरावली. भाषा दर दहा कोसांवर बदलते आणि त्यानुसार मराठी संभाषणाच्या विविध शैली विकसित होत गेल्या.

मराठी भाषा बोलणारे राज्य म्हणून १९६० साली भाषावार प्रांतरचनेत महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. त्यानंतर आजपर्यंत मराठी भाषेचा सतत विकास आपण बघतो. त्यापूर्वी असणाऱ्या काळातील मराठी भाषेचा प्रवास देखील तितकाच महत्त्वाचा आहे.

इसवी सन ५०० ते ७०० या काळात पूर्ववैदिक, वैदिक नंतर संस्कृत, पाली प्राकृत यात विविध उत्क्रांत होत मराठी भाषेचा उगम झालेला मानला जातो. ‘श्री चामुन्डाराये करविले’ असे शिलालेखावरील मराठी भाषेत लिखित पहिले वाक्य श्रावणबेळगोळ येथे असल्याचा दाखला उपलब्ध आहे.

संत वाङमयातून मराठीचा लिखित प्रसार होत गेला. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर यांच्या रचनांमधून लिखित तसेच बोलीभाषेतील मराठी प्रगत आणि प्रगल्भ होत होती. मराठी भाषेबाबत संत ज्ञानेश्वर यांनी केलेले वर्णन सार्थ आहे. ‘परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरेचि रसिके मेळविण’.

भाषेत असणारे सौंदर्य आणि ते अधिक खुलविणारे अलंकार सर्वात महत्त्वाचे म्हणजे नव्याचाही स्विकार करणारी भाषा म्हणून मराठीला पाहिले जाते. सर्व भाषांमधील शब्दांना जोडत आल्याने मराठी अधिकच समृद्ध झालेली आहे.

इतक्या वर्षांच्या प्रवासात विविध शासकांचा अंमल या प्रांतावर राहिला त्यामुळे मराठी भाषेत शब्दसंग्रह सातत्याने वाढत राहिला. अरबी, फारसी, उर्दू, इंग्रजी अशा अनेक भाषेतील शब्द मराठीत कायमचे आले आणि आज ते मराठी भाषेचा भाग बनलेले आपणास दिसतात. आज संगणक युगात मराठी इंटरनेटच्या प्रमुख भाषांपैकी एक आहे आणि मराठी भाषक आवर्जून मराठीचा वापर करतात, ही अतिशय अभिमानाची बाब आहे.

साधारण २०१० च्या प्रारंभी फेसबुकच्या सारख्या माध्यमातून मी मराठी वापरायला सुरुवात केली. त्यावेळी इंग्रजी शब्दावलीत मराठी संदेश लिहिणारे अधिक होते व मराठीचा असा मराठीचा वर्ग मी सुरू केल्यावर अनेक जण मराठी कडे आकर्षित झाले. संगणक क्रांतीत ‘युनिकोड’ आल्याने या आभासी जगात मराठीचा झपाट्याने विस्तार झाला. मी स्वतः या माध्यमाला दिलेले शब्द आज दरमहा कोट्यावधी वेळा वापरल्याचे संदेश येतात. त्यावेळी मराठी भाषक म्हणून याचा मलाही अभिमान वाटतो.

मराठी भाषेचा प्रवास केवळ पुस्तकातूनच नव्हे तर प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी मला शासकीय नोकरीच्या निमित्ताने मिळाली. २२  जिल्ह्यांमधून फिरताना त्या त्या ठिकाणचा मराठीचा लहेजा आणि गोडवा जाणवतो. रत्नागिरी ते गडचिरोली असा कार्यक्षेत्राचा प्रवास राहिल्याने मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात जशी भाषा वेगवेगळी बोलली जाते तशीच ती वऱ्हाडात, झाडीपट्टीत, पश्चिम महाराष्ट्रात तसेच कोकणात, खानदेशात आणि पुण्या – मुंबईतही वेगळी राहते.

महानगरीय प्रभाव असणारी मुंबईची मराठी खूपच वेगळी आहे. विद्येचं माहेरघर पुण्याची मराठी तितकीच सरळ आहे. आत्मियता जपणारी आणि विशिष्ट शब्दांना खेळवणारी वर्धा – नागपूरची मराठी वेगळी आहे. सिमावर्ती जिल्ह्यांमध्ये सिमेलगत असणाऱ्या नजिकच्या राज्यातील भाषेच्या प्रभावाखाली असणारी मराठी आणखीनच वेगळी वाटते.

कोकणातली मराठी, तळकोकणची मालवणी आणि गडचिरोलीतील मराठी एकदम भिन्न आहेत. जिल्हा बदल झाल्यास जाणवतं की पदार्थ, वस्तू आणि भांड्यांची नावे एकाच भाषेतली असली तरी ती जुळत नाही.

पुण्यात अमृततुल्य अर्थात चहा करतात तर मुंबईत चहा बनवतात. विदर्भात मात्र चहा मांडतात ही भाषिक गंमतच आहे. साधारणपणे रस्त्यावर डावीकडे किंवा उजवीकडे वळतात मात्र खानदेशात डावीकडे फाकाचं असतं.

मराठवाडी माणसं अंगावर कपडे घालतात मात्र वैदर्भिय मराठीत कपडे लावतात..खूप वाटत असला तरी तोच मराठीचा वेगळेपणा आहे. अगदी भाषा तीच फरक.. काई त नी. (वर्धा) अर्थात काही तर नाही….!

 0000

– प्रशांत विजया अनंत दैठणकर

जिल्हा माहिती अधिकारी, बीड