उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येरवडा येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन

पुणे, दि. ४: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येरवडा येथील भाजी मंडईच्या नूतनीकरण कामाचे तसेच शास्त्रीनगर चौक येथील उड्डाणपूल बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी आमदार सुनील टिंगरे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर, पुणे महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ. सुरेंद्रकुमार काटकर आदी उपस्थित होते.

शास्त्रीनगर चौक येथील नियोजित उड्डाणपूल :

पुणे महानगर पालिकेच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या शास्त्रीनगर चौक येथील नियोजित उड्डाणपूलाचे काम झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होऊन चौकातील वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होणार आहे. या पुलाचा अंदाजित बांधकाम खर्च ९७ कोटी रुपये आहे.

नियोजित मंडई इमारतीची वैशिष्ट्ये :

येरवडा येथील सद्या अस्तित्वात असलेल्या भाजी मंडईच्या ठिकाणी पार्किंग, तळमजला आणि पहिला मजला अशी तीन मजली नवीन इमारत बांधण्याचे प्रस्तावित आहे. नियोजित प्रकल्पाचा अंदाजे खर्च सुमारे १० कोटी रुपये इतका आहे.

नियोजित इमारतीत पार्किंग मजला सेमी बेसमेंट स्वरूपाचा असून त्यात ३७० दुचाकी पार्किंगची व्यवस्था केली आहे. तसेच शीत साठवण गृह (कोल्ड स्टोरेज), लोडींग, अनलोडींगची व्यवस्था केलेली आहे. तळ मजल्यावर भाजी मंडई व फळ मंडई प्रस्तावित असून प्रत्येकी १०० गाळ्यांची व्यवस्था असणार आहे. तर पहिल्या मजल्यावर मटण व मच्छी मार्केट प्रस्तावित आहे. पहिल्या मजल्यावर येण्यासाठी लोकांसाठी लिफ्टची सोय केली आहे. मालासाठी स्वतंत्र गुड्स लिफ्टची सोय केलेली आहे.

पार्किंग मजला, तळ मजला आणि पहिला मजला यांचे बांधकामाखालील एकूण क्षेत्र (बिल्ट अप एरिया) ७ हजार ५२ चौरस फूट प्रस्तावित आहे.

0000