मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुनर्वसित इर्शाळवाडीला भेट 

 पुनर्वसित विद्यार्थ्यांना नोकरी तर महिलांना देणार रोजगार 

0
143

रायगड जिमाका दि.4-  इर्शाळवाडी दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे.  सिडकोमार्फत या दरडग्रस्तांच्या 44 घराचे बांधकाम हे अंतिम टप्प्यात आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणी कामाचा आढावा घेतला. येत्या काही दिवसात या घराचा ताबा संबंधित कुटुंबाला देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुणे दौरा आटोपून मुंबईकडे जात असताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी इर्शाळवाडी पुनर्वसन कामाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, सिडको अधिकारी गणेश देशमुख यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जुलै 2023 साली खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळवाडी येथे रात्रीच्या सुमारास दरड कोसळून अनेक कुटुंब उध्वस्त झाली होती.  अनेकजण मृत्यू पावले होते.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इरसाल वाडीला भेट देऊन तात्काळ पुनर्वसन करण्याचे आश्वासन येथील नागरिकांना दिले होते. जवळपास वर्षभरापासून सिडकोच्या माध्यमातून चालू असलेले बांधकाम पूर्ण झाले असून येथे 44 घरांची  बांधणी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी इर्शाळवाडी येथील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना सिडकोच्या माध्यमातून नोकरीवर घेण्याचे आदेश सिडकोच्या अधिकाऱ्यांना  दिले. तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून  येथील महिलांना उद्योग उपलब्ध करून देण्याचे देखील कबूल केले.  तसा फोनही त्यांनी उद्योगमंत्र्यांना केला असून उद्योग खात्याचे अधिकारी संबंधित गावाला भेट देऊन तेथील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे देखील सांगितले.

इर्शाळवाडी येथे नव्याने उभारलेल्या घरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिल्यानंतर येथील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here