८०० यात्रेकरू तीर्थयात्रेसाठी विशेष रेल्वेने अयोध्येकडे रवाना

‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ ज्येष्ठ नागरिकांना आनंद देणारी- पालकमंत्री अब्दुल सत्तार

छत्रपती संभाजीनगर दि. ०६, (विमाका) : तीर्थयात्रा ही ज्येष्ठ नागरिकांना आनंद देणारी बाब असते. शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे,  अशा शब्दात राज्याचे अल्पसंख्यांक औकाफ, पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज अयोध्येकडे रवाना झालेल्या तीर्थयात्रेकरुंना शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने अंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर येथून ८०० जेष्ठ नागरिकांना घेऊन जाणारी जिल्हयातील पहिली रेल्वे अयोध्येकडे रवाना झाली. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते व गृह निर्माण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर या यात्रेकरुंना निरोप देण्यात आला. पालकमंत्री श्री. सत्तार यांनी हिरवा झेंडा दाखवून रेल्वे मार्गस्थ केली.

यावेळी गृह निर्माण मंत्री अतुल सावे, आमदार विक्रम काळे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे, सहायक आयुक्त पांडुरंग वाबळे उपस्थित होते.

आज ‘जय श्रीराम जय जय श्रीराम’ च्या जयघोषात ८०० जेष्ठ नागरिक तीर्थ दर्शनासाठी विशेष रेल्वेने मार्गस्थ झाले.

पालकमंत्री श्री सत्तार म्हणाले, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत जिल्ह्यातून ही पहिली भाविकांची रेल्वे अयोध्येसाठी रवाना होते आहे. श्रीरामाचे दर्शन घेण्याची ही  संधी या यात्रेमुळे आपल्या जिल्ह्यातील जेष्ठांना मिळते आहे. जेष्ठांना आनंद देणारी ही योजना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून राज्य शासनाने सुरू केलेल्या योजनेचा लाभ राज्यातील अनेक शेतकरी, शेतमजूर  व सर्वधर्मीय नागरिकांना  होत आहे. राज्य शासनाचा हा क्रांतीकारी निर्णय आहे. छत्रपती संभाजीनगर ते प्रभू श्री रामांची जन्मभूमी आयोध्या या तीर्थयात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व ज्येष्ठांना रेल्वेत सर्व सोई देण्यात आल्या आहेत असे सांगून त्यांनी यात्रेकरूंचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

गृह निर्माण मंत्री अतुल सावे म्हणाले, तीर्थ दर्शन योजनेतून अयोध्येला जाण्यासाठी ही एक संधी आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रभू श्री रामांची जन्मभूमी अयोध्या येथील मंदिराचे लोकार्पण केल्यानंतर अनेक जेष्ठांची अयोध्येला जाण्याची इच्छा होती. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून ही इच्छापूर्ती होते आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून  या योजनेची आखणी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरप्रमाणेच जालना जिल्हयात 790 अर्ज पात्र ठरले  आहेत, त्याबाबतचे नियोजनही लवकरच करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

आमदार विक्रम काळे यांनी तीर्थयात्रेत सहभागी ज्येष्ठांसाठी रेल्वेत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असून या योजन अंतर्गत सर्व खर्च शासन करणार असल्याचे सांगून प्रवासाला शुभेच्छा दिल्या.

विभागीय आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, आपल्या छत्रपती संभाजीनगर  विभागात जिल्हानिहाय तीर्थदर्शन योजनेचे नियोजन सूरू आहे. जालना, नांदेड व बीड जिल्हयातूनही लवकरच प्रवासी रवाना होतील. 60 वर्षावरील जेष्ठांना लाभ मिळत असून आजच्या या अयोध्येच्या दर्शन यात्रेत 136 नागरिक 75 वर्षाच्या पुढील आहेत, त्यांच्यासोबत काळजी घेण्यासाठी 136 काळजी घेणारे प्रवासी असणार आहेत. 6 ते 10 ऑक्टोबर असा हा प्रवास असणार आहे.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने अंतर्गत ज्या नागरिकांचे वय 60 पेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी ही योजना आहे. यामध्ये आपल्या जिल्हयातील 800 नागरिकांनी अयोध्या येथे जाण्याचा निर्णय घेतला.  तीर्थ दर्शन योजनेसाठी 2 हजारावर अर्ज आले असून पहिल्या टप्प्यात 800 जेष्ठ नागरिक आज अयोध्येकडे रवाना होत आहेत, या नागरिकांना ही यात्रा निश्चितपणे आनंद देईल, असे ते म्हणाले.

स्वागताने जेष्ठ भारावले

भगव्या पतका, फेटे, टोप्या, उपरणे परिधान केलेल्या प्रवाशांचे फुलांची उधळण व झेंडूच्या फुलांचे हार घालून रेल्वे स्थानकावर  स्वागत करण्यात आले. अयोध्येला जाणारी विशेष रेल्वे फुलांच्या माळा आणि फुगे बांधून सजविण्यात आली होती. रेल्वे स्थानकावर आगमन होताच केलेले स्वागत पाहून जेष्ठ नागरिक भारावून गेले. अनेकांनी आयुष्यात पहिल्यांदाच अयोध्येला जात असल्याचे सांगत आनंद व्यक्त केला.

रेल्वेत वैद्यकीय सुविधांची उपलब्धता

तीर्थयात्रेत सहभागी ज्येष्ठांसाठी रेल्वेत औषध, वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. जेष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

यावेळी अयोध्या यात्रेसाठी निघालेले नागरिक उपस्थित होते.

०००००००