येवला तालुका सुजलाम् सुफलाम् करणार – मंत्री छगन भुजबळ

देवना साठवण तलावाचे भूमिपूजन

नाशिक, दि. 6 ऑक्टोंबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : येवला तालुका सुजलाम् सुफलाम् करावयाचा आहे. त्याचे नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यात सिंचनाची विविध कामे सुरू आहेत. ती लवकरच पूर्णत्वास येतील. त्याबरोबरच पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. त्यामुळे लवकरच घराघरात नळाद्वारे पाणीपुरवठा होईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला तालुक्यातील देवना साठवण तलावाच्या कामाचे भूमिपूजन मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते आज दुपारी आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे प्रादेशिक अधिकारी हरिभाऊ गीते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, येवला तालुक्यात सिंचनाची विविध कामे प्रस्तावित केलेली आहेत. त्यापैकीच ममदापूर आणि देवना तलावाचे काम आहे. देवना तलावाच्या कामावर १५ कोटी ६५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. घराघरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी राजापूर, धूळगाव, लासलगाव पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास येत आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

देवना साठवण तलावाची माहिती

येवला तालुक्यासाठी उपयुक्त ठरणारा हा तलाव आहे. देवना साठवण तलाव हा येवला तालुक्यातील खरवंडी व देवदरी गावाजवळील दोन मोठ्या नाल्यांच्या संगमावर माणिकपुंज मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आहे. येवला तालुक्यातील देवदरी, खरवंडी, राहडी,कोळम खु. परिसरातील शेतील उपसा पद्धतीने सिंचनाचा लाभ होणार आहे.

याशिवाय वन्य प्राण्यांच्या पिण्यासाठी व रोपवाटीकेसही लाभ होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून  २.०८ दलघमी (७३.४४दलघफू) पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. या योजनेसाठी संयुक्त मोजणीनुसार वैजापूर तालुक्यातील १३ हेक्टर व येवला तालुक्यातील ४४ हेक्टर असे एकूण ५७ हेक्टर क्षेत्र संपादित होत आहे.    त्यापैकी ५५.७५ हेक्टर वनक्षेत्र असून १.२५ हेक्टर क्षेत्र हे खासगी आहे. योजनेच्या बुडीत क्षेत्रापैकी ५७ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

००००००