नाशिक, दि. 7 ऑक्टोबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाज परिवर्तनासाठी साहित्य हे माध्यम निवडले. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यक्षेत्रातील योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
आज येवला शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक भूमिपूजन समारंभ प्रसंगी मंत्री श्री. भुजबळ बोलत होते.
यावेळी तहसिलदार आबा महाजन, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, यांच्यासह मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
मंत्री श्री.भुजबळ यावेळी म्हणाले, स्थानिक विकास निधीमधून हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक विकसित करण्यात येत असून उत्तम दर्जाचे काम होणार आहे. यासाठीच्या अनुषंगिक कामांसाठी अधिकच्या निधीची उपलब्धता केली जाणार असल्याचे मंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले. अन्यायाची जाणीव करून देणे आणि त्याविरोधात लढण्यासाठी उद्युक्त करणे हेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे उद्दिष्ट होते. त्यांच्या साहित्याने महाराष्ट्रात परिवर्तन घडून आले. अण्णाभाऊंनी विविध साहित्यप्रकार हाताळले. यात ३५ कादंबऱ्या, आठ पटकथा, १५ स्फुट कथा, एक प्रवासवर्णन, तीन नाटके, १२ उपहासात्मक लेख, १४ लोकनाट्ये, १० पोवाडे एवढी मोठी साहित्यसंपदा त्यांनी आपल्या लेखणीतून निर्माण केली. त्यांच्या प्रत्येक कादंबरीचा, कथेचा, नाटकाचा, लोकनाट्याचा नायक हा समाजातील बंडखोर व्यक्ती होता. अण्णाभाऊंनी जीवनासाठी कला या अनुषंगाने आपली साहित्यसंपदा निर्माण केली. तसेच समाजातील वंचित, दीन दलित, कष्टकरी, स्त्रिया, भटके यांच्या व्यथा-वेदना साहित्यातून मांडल्या.
अण्णाभाऊंचा जन्म ज्या सातारा-सांगली-वाटेगाव परिसरात झाला. त्यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षात गेले. वाटेगाव ते रशियातील मॉस्कोपर्यंतचा प्रवास हा त्यांच्या संघर्षाचा पुरावाच आहे. एखाद्या विचारप्रणालीचा स्वीकार हा बहुधा त्या व्यक्तीच्या पार्श्वभूमीवर अवलंबून असतो. अण्णाभाऊंना भाकरीचा प्रश्न महत्त्वाचा वाटला. त्या प्रश्नाच्या अनुषंगाने येणाऱ्या कामाचे महत्त्व सांगणाऱ्या मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचा परिचय त्यांना झाला आणि त्यातूनच ते मार्क्सवादाकडे वळले. ‘अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे जगण्यासाठी लढणाऱ्या माणसांचे साहित्य’, असे सार्थ वर्णन प्र. के. अत्रे यांनी केले आहे. लोकनाट्याद्वारे त्यांनी कामगारांच्या श्रमाचा पुरस्कार करणारे आणि जमीनदारांच्या शोषणाचा धिक्कार करणारे तत्त्वज्ञान मांडले आहे.
अण्णाभाऊंच्या साहित्यात कधीही जातीय संघर्ष दिसून येत नाही. प्रखर बुद्धिवाद, समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व, समाजवादी विचार यांच्या वौचारिक साधनेवर अण्णा भाऊंचा वाङ्मयीन दृष्टिकोन उभा आहे. त्यांच्या साहित्याचे एकूण प्रयोजन सामान्यातल्या सामान्य माणसाला क्रांतीप्रवण करणे व या देशातील जात-वर्गाला मूठमाती देणे होय. सामाजिक वास्तवाची प्रखर जाणीव असलेल्या या क्रांतिकारी साहित्यिकाला विनम्र अभिवादन करीत मंत्री श्री.भुजबळ यांनी उपस्थितांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा विचार पुढे नेण्याचे आवाहन केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन हा येवला शहरातील महत्वाचा सोहळा असून सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांची भूमिका व लिखित साहित्याचा विचार हा सामाजातील तळागाळापर्यंत पोहचला आहे. वाटेगाव सारख्या छोट्या गावात अण्णा भाऊ साठे यांचा जन्म झाला कमी शिक्षणातून त्यांनी प्रचंड साहित्यसृष्टी निर्माण केली. आज अनेक विद्यार्थी त्यांच्या साहित्यावर पीएच.डी करीत आहेत. त्यांच्या विचाराचे आपण सर्व वारस असल्याचे सचिन साठे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरवातील मंत्री छगन भुजबळ व मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन कोनशिलेचे अनावरण व शिल्पपूजन करण्यात आले. यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज जिल्हा वार्षिक योजना पर्यटन विकास कार्यक्रम अंतर्गत रोकडोबा हनुमान मंदिर येथे १.५० कोटी निधीतून विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.
००००