सर्व सामान्यांसाठी आवश्यक वैद्यकीय शिक्षण, आरोग्यसेवा देण्यासाठी  १२ रूग्णालये मंजूर करुन निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचा आनंद – पालकमंत्री हसन मुश्रीफ

उत्तुर, आजरा येथील शासकीय योग आणि निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रूग्णालयाच्या इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

कोल्हापूर, दि.07 (जिमाका) : समाजातील सर्व घटकांतील वैद्यकीय शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच सर्व सामान्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा पोहोचण्यासाठी १२ वेगवेगळ्या रूग्णालयांची मंजूरी घेवून त्यांच्या निविदा प्रक्रिया पुर्ण केल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांच्याहस्ते उत्तुर, आजरा येथील शासकीय योग आणि निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रूग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन उत्तूर/बहिरेवाडी, ता. आजरा जि. कोल्हापूर येथे संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. 187 कोटी रुपयांच्या निधीमधून पदवी महाविद्यालय आणि रुग्णालय उभे राहणार आहे. तसेच बहिरेवाडी येथे महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाल्याचे त्यांनी कार्यक्रमात सांगितले. या कार्यक्रमाला आयुष संचालनालयाचे संचालक डॉ.रामन घुंगराळेकर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान, विद्यापीठ नाशिकचे प्र.कुलगुरू मिलिंद निकुंभ, शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय उत्तुरचे प्रशासकीय अधिकारी न.रा. पाटील, अधिष्ठाता डॉ.भाग्यश्री महावीर खोत, डॉ.वीणा पाटील, डॉ.आदर्श देसाई यांच्यासह उत्तुर व बहिरेवाडीचे सरपंच, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, उत्तुर येथे १५ एकर जागेत निसर्गरम्य ठिकाणी एक चांगले महाविद्यालय सुरू होत आहे. याचा फायदा स्थानिकांना वैद्यकीय क्षेत्रात होणार आहे. तसेच याच महाविद्यालयाच्या शेजारी १०० प्रशिक्षणार्थी क्षमतेचे राज्यस्तरीय वैद्यकीय तांत्रिक प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहे. या तांत्रिक प्रशिक्षण केंद्रासाठी एकूण रुपये २५२.०३५ कोटी इतक्या खर्चास मान्यता मिळाली आहे. शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय उत्तुर अंतर्गत येणारे कॉलेज बहिरेवाडी येथील जे.पी.नाईक स्मारकाच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आले असून या ठिकाणी पहिली तुकडी याचवर्षीपासून सुरू होत आहे. या इमारतीला १.५४ लक्ष रूपये दर महिना भाडेही शासनाकडून दिले जाणार आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हयात शेंडा पार्क, सांगाव, आणि ऊत्तुर येथील वेगवेगळ्या महाविद्यालय आणि रूग्णालयांच्या मंजूरी व सुविधांबाबतची माहिती उपस्थितांना दिली. त्यांनी उपस्थित संचालक आणि प्र. कुलगुरूंचे आभारही मानून मान्यता व प्रक्रिया जलदरीतीने राबविल्याबद्दल सत्कारही केला. संचालक डॉ.रामन यांनी आपल्या मनोगतामध्ये देशात योग व निसर्गोपचार केंद्र मागील ७० वर्षात ६ सुरू झाल्याचे सांगून मंत्री हसन मुश्रीफ यांनी केवळ दीड वर्षात ५ नव्याने सुरू करण्यास मान्यता दिली असल्याचे सांगितले. अगदी अल्प काळात मेडीकल हब तयार करण्याचे श्रेय केवळ त्यांनाच जाते असे गौरवोद्गार त्यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्याबद्दल काढले. प्र.कुलगुरू निकुंभ यांनी योग आणि निसर्गोपचार काय आहे याबद्दल उपस्थितांना सांगितले. पदवी अभ्यासक्रम ४ वर्षांचा असून इंटर्नशिप एक वर्षाची असेल. पहिल्या वर्षी ६० विद्यार्थी असतील अशारीतीने पुढिल चार वर्षात २४० विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर पुर्ण क्षमतेने कॉलेज सुरू राहील. या महाविद्यालयामुळे स्थानिकांना चांगल्या आरोग्यसेवाही मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता भाग्यश्री महावीर खोत यांनी केले. या कार्यक्रमात ग्रामस्थांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जाहीर सन्मान व सत्कार केला.

0000