राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना मतदान ओळखपत्र प्रदान

मुंबई,दि.१६ : राज्यात विधानसभेसाठी दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतमोजणी दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे प्रथम नागरिक राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हेदेखील मुंबई शहर जिल्ह्यातील १८५ मलबार हिल मतदार संघातील मतदार म्हणून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या पार्श्वभूमीवर १८५ मलबार हिल मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब मुरलीधर वाकचौरे यांनी राजभवन येथे  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना त्यांचे मतदान ओळखपत्र प्रदान केले.

जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर तथा  महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी तसेच जिल्हाधिकारी मुंबई शहर तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध घटकातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्वच स्तरातील मतदारांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे. याशिवाय मतदार यादीतील मतदारांची नावे व त्यांचा तपशीलही अद्ययावत करण्यात येत आहे. राजकीय, शासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती मुंबई शहर जिल्ह्यात मतदार असून येत्या २० नोव्हेंबरला ते मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यातील १८५ मलबार हिल मतदार संघात एकूण २६०५६० मतदार असून त्यापैकी १३५०९४ पुरुष, १२५४५४ महिला तर १२ तृतीयपंथी मतदार आहेत. राज्यात एकूण २८८ जागांसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर २०२४ असून, उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत ४ नोव्हेंबर २०२४आहे.