मतदानासाठी मतदान साहित्य घेऊन कर्मचारी रवाना  

  • २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान
  • ५० टक्के मतदान केंद्रावर असणार वेब कॅमेराची नजर
  • १५२३ मतदान केंद्रावर होणार मतदान
  • मोबाईल मतदान केंद्रास घेऊन जाण्यास प्रतिबंध

धाराशिव, दि.१९ (माध्यम कक्ष)  विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार २० नोव्हेंबर  रोजी मतदान होणार आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानासाठी जिल्हयातील उमरगा, तुळजापुर,उस्मानाबाद आणि परंडा या विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदानाचे साहित्य सोबत घेऊन अतिशय उत्साहाच्या वातावरणात कर्मचारी आज १९ नोव्हेंबर रोजी रवाना झाले.

 २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या पूर्वतयारीचा आढावा भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या निवडणूक निरीक्षक सामान्य, खर्च व पोलीस यांनी १७ नोव्हेंबर रोजी आयोजित आढावा सभेत घेतला.

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील १५२३ मतदान केंद्रावर मतदान पथके रवाना झाली.१५२३ मतदान केंद्रापैकी ५० टक्के मतदान केंद्रावर वेब कास्टिंगद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे. निवडणूकविषयक गैरप्रकारांच्या तक्रारीबाबत नागरिकांना सी-व्हिजिल अँपद्वारे तक्रार दाखल करता येईल.

निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने विधानसभा मतदारसंघात १२७ पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी व होमगार्ड असे एकूण ३१५७ कर्मचारी आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या ३  तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहे.

उमेदवार,उमेदवारांचे प्रतिनिधी,मतदान प्रतिनिधी व मतदार यांना मोबाईल (भ्रमणध्वनी) घेऊन मतदान केंद्रात प्रवेश करु नये अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिली.