मुंबई. दि. २ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘महापरिनिर्वाणदिना’ निमित्त ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व आर्थिक विचार’ या विषयावर अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक डॉ. भालचंद्र लक्ष्मण मुणगेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरूवार दि. ५ आणि शुक्रवार दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून देशाची राज्यघटना लिहिली आणि देशाला एक सर्वंकष संविधान दिले. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार‘ असेही संबोधले जाते. त्याअनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य कार्याबद्दल डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती दिली आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
००००