विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय  

लोणार विकास आराखड्यातील विकासकामांची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

अमरावती, दि. 8 : लोणार विकास आराखड्यातील विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासह विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे निर्देश लोणार विकास आराखडा समिती अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी संबंधित कार्यान्वयन यंत्रणांना दिले.

लोणार विकास आराखड्यांतर्गत असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी व कामांच्या प्रगतीचा आढावा डॉ. पाण्डेय यांनी शनिवारी (ता.7 डिसेंबर) लोणार येथे घेतला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. बुलडाण्याचे प्रभारी जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, समितीचे सदस्य तथा न्यायालयीन मित्र ॲड. एस. सान्याल, ॲड. दिपक ठाकरे, ॲड. कप्तान, ॲड. परचुरे, भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलीक, विशेष कार्य अधिकारी सुशील आग्रेकर, वनविभाग, नगरपरिषद, एमएमआरडीएचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, बुलडाणा जिल्ह्यातील बेसॉल्ट खडकात उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर हे जगविख्यात आहे. हे स्थळ जैवविविधतेने सपन्न असून पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. लोणार सरोवराच्या जतन, संवर्धन व विकास तसेच परिसराच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाव्दारे 369 कोटी 78 लक्ष रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. विकास आराखड्यातील नियोजि कामे पूर्णत्वास जाण्यासाठी समितीव्दारे नियमितपणे आढावा घेण्यात येतो. आराखड्यांतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता व निधीची तरतूद उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार आरखड्यातील विकासकामे गतीने पूर्ण होण्यासाठी कार्यान्वयन यंत्रणांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. विकास आराखड्यांतर्गत येणारी लोणार सरोवर व परिसरातील नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावीत, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

प्रत्यक्ष स्थळ पाहणी दरम्यान समिती सदस्यांद्वारे लोणार सरोवर, अन्नछत्र, वेट वेल प्रसाधान गृह,  गोमुख परिसर इत्यादी ठिकाणी भेटी देण्यात आल्या. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या गोमुख परिसरात ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना सुलभरित्या पोहोचणे सोईचे होण्यासाठी रॅम्पची व्यवस्था त्याठिकाणी करण्यात यावी. प्रसाधनगृहाचा योग्यरीत्या वापर होण्यासाठी पाण्याची व्यवस्था नियमित ठेवावी, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी संबंधित यंत्रणांना यावेळी दिले. शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने योग्य ते नियोजन पुढील बैठकीदरम्यान सादर करावे, असेही त्यांनी सांगितले.

गोमुख परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराची लिंक पोलीस विभागाला देण्यात यावी, जेणेकरून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस विभागाला लक्ष ठेवणे सोयीचे होईल. तसेच पोलीस व भारतीय पुरातत्व विभाग यांनी परिसरात कुठलिही अनुचित घटना घडू नये यादृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवावे. यावेळी तारांगण व संग्रहालय स्थापन करण्याकरिता पर्यटन विभागाच्या सादरीकरणाला एकमताने समितीव्दारे मंजूरी देण्यात आलेली आहे. वेडी बाभूळ निष्काशनाबाबत प्रायोगिक तत्त्वावर सर्वेक्षणाच्या आधारे सॅम्पल प्लॉट निवडून नियमानुसार योग्य ती कार्यवाही पूर्ण करावी व तसा अहवाल फेब्रुवारी-2025 पर्यंत समितीस सादर करावा, असे निर्देश वनविभागाला देण्यात आले.

000