रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर

मुंबई, दि.१२ : राज्य शासनामार्फत रब्बी हंगामामध्ये देखील शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा योजना लागू केली आहे. तरी शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन आपल्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा पिकाचा विमा उतरवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ आहे.

राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१६-१७ पासून राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम २०२३ पासून महाराष्ट्र शासनामार्फत एक रूपयात पीक विमा योजना लागू केली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. चालू रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in या संकेतस्थळास भेट द्या.

महाराष्ट्रात रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच रब्बी कांदा पिकासाठी भाग घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ आहे. तर उन्हाळी भात व उन्हाळी भुईमुग या पिकांसाठी ही मुदत ३१ मार्च २०२५ पर्यंत आहे. गतवर्षी रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये विमा योजनेत साधारणता ७१ लाख विमा अर्ज प्राप्त झाले होते.