मुंबई, दि. 12 : मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ देण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या विषयावर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. ही बाब विचारात घेऊन केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात मराठी भाषेचा दर्जा’ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे. मराठी भाषेला मोठा इतिहास आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध सांस्कृतिक वैभवाची जगभरात ओळख असून ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असणार आहे. याचबरोबर मराठी भाषेच्या बोलींचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळणार असून, संशोधन आणि साहित्यसंग्रह करण्याच्या दृष्टीने चालना मिळणार आहे. त्या अनुषंगाने अभिजात भाषेचा दर्जा आणि अभिजात दर्जा बहाल केल्यास मराठी भाषेत नेमके काय बदल होणार आहे आणि मराठी भाषेचा इतिहास काय आहे या विषयी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून डॉ. सदानंद मोरे यांनी माहिती दिली आहे.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत दोन भागात प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार दि. 17 डिसेंबर 2024 रोजी तर दुसऱ्या भागाचे मंगळवार दि. 24 डिसेंबर 2024 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारण होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे.
एक्स – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
‘दिलखुलास’कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार दि. 14, सोमवार दि. 16, मंगळवार दि. 17 बुधवार दि. 18 आणि गुरूवार दि. 19 डिसेंबर 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ निवेदक दीपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.