विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून अधिवेशन तयारीचा आढावा

दोन्ही सभागृह व परिसराची पाहणी करुन व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांना दिले निर्देश

नागपूर,दि. 15 : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार दिनांक 16 डिसेंबरपासून सुरु होत आहे. त्या अनुषंगाने विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तयारीचा आढावा घेतला. अधिवेशन कालावधीत कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणांना केल्या.

विधानभवनाच्या मंत्रिपरिषद दालनात आयोजित बैठकीला विधानमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, वि. गो. आठवले, महसूल विभागाच्या अपर आयुक्त राजलक्ष्मी शहा, उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्यासह विधानमंडळ, महसूल, उर्जा, बांधकाम, परिवहन, दुरसंचार, आरोग्य, शासकीय मुद्रणालय, अन्न व औषध प्रशासन आदी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अधिवेशन काळात कुठेही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या. मंत्री, आमदारांसह, विधानमंडळ तसेच अन्य विभागाचे बाहेरून येणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध झाल्या पाहिजेत, अशा सूचना डॉ.गोऱ्हे यांनी केल्या. दरवर्षी उत्तम नियोजन केले जाते. त्याप्रमाणे यावर्षीदेखील चांगले नियोजन होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विधानभवनासह अधिवेशन कामकाजाशी संबंधित सर्व इमारतींची वीजपुरवठ्याची चाचणी घेण्यात आली आहे. सर्व ठिकाणी विशेष मनुष्यबळ ठेवण्यात आले असून पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. विधानमंडळ परिसरात पार्किंगचे एकूण सात स्लॉट तयार करण्यात आले असून या व्यवस्थेचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. विधानभवन इमारतीत हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आमदार निवास येथेदेखील कक्ष उभारण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सर्व ठिकाणी दूरध्वनी व वायफाय कनेक्शन देण्यात आले आहेत. आतापर्यंत 884 वाहने पुरविण्यात आली आहे. अतिरिक्त वाहने लागल्यास तशी व्यवस्था करण्यात आली आहे. विधानभवनाच्या आतील व बाहेरील सुरक्षा व्यवस्था, नागभवन, रविभवन, आमदार निवास येथे आवश्यक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. व्हीआयपींना भेटण्यासाठी येणाऱ्या अभ्यागतांना पास घेऊनच प्रवेश दिला जाईल, असे पोलिस विभागाच्यावतीने यावेळी सांगण्यात आले.

शहरात 38 प्रस्तावित ठिकाणी निवास व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणची दुरूस्ती, रंगरंगोटी करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्यावतीने पाणीपुरवठा, स्वच्छता व अग्निशमन सेवा पुरविण्यात येणार आहे. यासाठी विशेष स्वच्छता पथके कार्यरत राहणार असून स्वच्छतेसाठी जलद प्रतिसाद पथके देखील नेमण्यात आली आहेत. विधानभवनसह विविध ठिकाणी पाच आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आले आहे. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी, आवश्यक मनुष्यबळ व औषधे तसेच ॲम्ब्युलन्स उपलब्ध राहणार आहे. विधानभवन व सर्व संबंधित इमारतींचे फायर ऑडिट करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

उपसभापतींकडून दोनही सभागृहांची पाहणी

      बैठकीपूर्वी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषद व विधासनसभा या दोन्ही सभागृहांची पाहणी केली. विधिमंडळ कामकाजासाठी सदस्यांकरिता यावेळी पेपरलेस व्यवस्था करण्यात करण्यात आली आहे. त्याची माहिती संबंधितांकडून जाणून घेतली. दोन्ही सभागृह कामकाजासाठी तयार असल्याची खात्री केली व व्यवस्थेबाबत संबंधितांशी चर्चा केली. यासोबतच विधानभवन परिसरातील पक्ष कार्यालयांनाही भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.