नागपूर, दि. १८ : राजस्थानमधील जैसलमेर येथे होणाऱ्या डिसेंबर २०२४ च्या जीएसटी परिषदेमध्ये मंत्री आदिती तटकरे या राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर मंत्री कु. तटकरे यांनी विधानभवन येथे झालेल्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांकडून जीएसटीबाबत सविस्तर आढावा घेतला.
या बैठकीस राज्य कर आयुक्त आशिष शर्मा, विक्रीकर सह आयुक्त किरण शिंदे, विक्रीकर उपायुक्त नंदकुमार दिघे आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री कु. तटकरे यांनी यापूर्वी झालेल्या ‘जीएसटी’ परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याने सुचविलेल्या सुधारणा, नव्याने सुचवावयाच्या सुधारणा, करांमध्ये विविध उद्योग, घटक यांना द्यावयाची सूट तसेच कररचनेमध्ये सुलभता आणि करदात्यांच्या व्याख्या सुस्पष्ट असण्याबाबतची माहिती घेतली. इलेक्ट्रीक वाहने, विमा हप्ते, कृषी उत्पादने यासारख्या क्षेत्रांना करांमध्ये सूट देण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. तसेच काही क्षेत्रांमध्ये करावयाची करकपात आणि करवाढ, त्यामुळे महसुलामध्ये येणारा फरक याची माहितीही मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी घेतली.
जैसलमेर येथे दि. २० व २१ डिसेंबर २०२४ असे दोन दिवस ही जीएसटी परिषद होणार आहे. तसेच या परिषदेवेळी अर्थसंकल्पाविषयीही बैठक होणार आहे. यामध्ये राज्यांच्या अर्थसंकल्पाकडून असणाऱ्या अपेक्षांची चर्चा करण्यात येणार आहे. याविषयीही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
0000
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/