नागपूर, दि.20 : दैनिक ‘देशदूत’चे संस्थापक आणि प्रख्यात उद्योजक देवकिसन सारडा यांच्या निधनाने सेवाव्रती उद्योगपती आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री. सारडा यांचे नाशिक शहर, जिल्हा आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील योगदान मोठे आहे. विविध संस्थांची निर्मिती करताना त्यांनी मूल्य जोपासण्यावर भर दिला. त्यांनी ‘देशदूत’, ‘सार्वमत’ वृत्तपत्रांची स्थापना करून लोकभावनेला आणि लोकप्रश्नांना व्यासपीठ मिळवून दिले. त्यांनी १९५९ मध्ये श्री सिन्नर व्यापारी बँकेची स्थापना करून सहकार क्षेत्रात पदार्पण केले. नाशिक, अहमदनगर, सोलापूर व बुलढाणा जिल्ह्यांतील नागरी सहकारी बँका सुरू होण्यास त्यांचा हातभार लागला आहे. सहकार चळवळ वाढविण्यात आणि रूजविण्यात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
००००