नागपूर, दि. 21 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना वंदन करुन प्रेरणा व नवी ऊर्जा मिळते. दीक्षाभूमीला आल्यानंतर नेहमीच वेगळी अनुभूती व समाधानही मिळते, अशा भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. यानंतर श्री.शिंदे यांनी बुद्ध प्रतिमा व बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेवून अभिवादन केले. मंत्री सर्वश्री दादाजी भुसे, शंभुराज देसाई, उदय सामंत, प्रताप सरनाईक, योगेश कदम, माजी खासदार जोगेंद्र कवाडे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे राजेंद्र गवई आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, दीक्षाभूमी ही तप आणि आदर्शाची भूमी आहे. बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होवून देश-विदेशातील अनुयायी येथे येतात व प्रेरणा घेतात. बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच देशाचा व राज्याचा कारभार चालत आहे. बाबासाहेबांचे विचार सर्वसामान्यांना न्याय देणारे व जनसेवेला बळ देणारे आहेत. राज्यशासनाच्या वतीने तालुकानिहाय संविधानभवन बांधण्यात येत आहेत. तसेच चैत्यभूमीवर जागतिक दर्जाचे स्मारक बांधण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
0000