नंदुरबार, दिनांक 26 (जिमाका) : जिल्ह्याला आकांक्षित श्रेणीतून बाहेर काढून प्रगतीपथावर घेवून जाण्याची सर्वांची जबाबदारी असून त्या उद्देशाने सर्व यंत्रणांनी काम करावे, असे निर्देश केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी आज दिले.
जिल्हा नियोजन भवन येथे आकांक्षित जिल्हा प्रकल्प अंतर्गत जिल्ह्याच्या कामगिरी बद्दल व निर्देशांकाचा आढावा राज्यमंत्री श्री. सेठ यांनी बैठकीतून घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, आकांक्षित जिल्हा प्रकल्पांतर्गत उद्दिष्ट निश्चित केलेल्या विविध विभागांचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलतांना केंद्रीय राज्यमंत्री संजय सेठ म्हणाले की, आकांक्षित जिल्ह्याला प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी कसे आणता येईल यासाठी सर्व संबधित विभागांनी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत, जिल्हा हाच देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे.
जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी यांनी आपले जन्मदिवस, लग्नाचे वाढदिवस, आदि विविध कार्यक्रम हे जिल्ह्यातील दुर्गम भागातील अंगणवाडीत जावून बालकांसोबत साजरा करावेत, त्यांना खेळणी, पुस्तके यांचे वाटप करावे तसेच दुर्गम भागातील अंगणवाडी इमारतीच्या भिंतीवर स्थानिक कला संस्कृतीचे चित्र रंगवावीत त्यातून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल.
यावेळी राज्यमंत्री श्री. सेठ यांनी अंगणवाडी इमारत, विद्युत, किसान सन्मान योजना, कृषि, पिक विमा, मत्सव्यवसाय, मध संकलन, मशरुम शेती, स्ट्रॉबेरी, रेशीम शेती, दुध संकलन आदि विषयांचा आढावा घेतला तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तयार केलेली उत्पादने सिताफळ आईस्क्रीम, स्ट्राबेरी, आमचुर पावडर, लिंबू पावडर, गुळ, तूरदाळ, तांदूळ, यांची प्रत्यक्ष पाहणी करुन माहिती घेतली.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आकांक्षित जिल्हा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत सादरीकरण केले.
0000