मुंबई, दि. २६ : राज्याच्या विकासात महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक गतीने कार्य करणार, असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले.
मंत्रालयात दालन क्रमांक १०३ येथे त्यांनी विभागाचा पदभार स्विकारला. त्यानंतर विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त प्रशांत नारनवरे, एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ (PMJJBY) व ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ (PMSBY) लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याकरिता केंद्र सरकारचा ६०टक्के तर राज्य शासनाकडून ४० टक्के हिस्सा असणार आहे. या योजनेकरिता पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येईल. तसेच अंगणवाडी सेविकांमधून मुख्यसेविका या पदावर निवडीने नियुक्ती करण्याबाबतची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाचे अभिप्राय घेऊन लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचेही कु. तटकरे यांनी सांगितले. ग्राम बालविकास केंद्राच्या धर्तीवर नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्याकरिता नागरी बालविकास केंद्र (UCDC) लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.
0000
काशीबाई थोरात/विसंअ/