विभागीय क्रीडा संकुल समिती, छत्रपती संभाजीनगरच्या बँक खात्यातून गेलेली रक्कम संकुल समितीच्या बँक खात्यात त्वरीत जमा करण्याच्या सूचना

मुंबई, दि. 26 : विभागीय क्रीडा संकुल समिती, छत्रपती संभाजीनगरच्या बँक खात्यातून अनधिकृतरित्या झालेल्या आर्थिक अफरा-तफरीबाबत विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यात संबंधित रक्कम त्वरीत जमा करणेबाबत बँकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे सखोल चौकशी

इंडियन बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आज २६ डिसेंबर २०२४ रोजी या विषयी चर्चा करण्यात आली असून त्यांचे स्तरावर या व्यवहारामध्ये बँकेकडून झालेल्या अनियमितता, निष्काळजीपणा संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सखोल चौकशीची कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या. तसेच, या दरम्यान शासनाचा अपहारित्त निधी विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यात त्वरीत जमा करणेबाबत देखील बँकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहेत.

जवाहरनगर पोलीस स्टेशनछत्रपती संभाजीनगर येथे तक्रार

अंदाजे रु.२१.५९ कोटी रूपयांच्या अफरातफरीची बाब दि.१३ डिसेंबर २०२४ रोजी निदर्शनास आल्याने विभागीय उपसंचालक यांनी दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी जवाहरनगर पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार अर्ज सादर केला.

कार्यादेश देण्यापुर्वी बँकेत शिल्लक रकमेबाबत चौकशी

छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुल समितीचे इंडियन बँक, जालना रोड शाखा येथे बँक खाते आहे. या खात्यावरील शिल्लक निधीतून सिंथेटिक अॅथलेटिक्स ट्रॅकची निविदा प्रक्रीया करण्यात आलेली होती. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कार्यादेश देण्यापूर्वी बँकेत शिल्लक रकमेबाबत चौकशी केली असता समितीच्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम कमी झाल्याचे व स्टेटमेन्टमध्ये कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी हर्षकुमार क्षीरसागर याचे नावे मोठ्या रकमा ट्रान्सफर झाल्याचे दिसून आले.

बँकेचा निष्काळजीपणा

बँकेकडे अधिक चौकशी केली असता आर्थिक व्यवहार हे नेट बँकिंग सुविधेमार्फत झाल्याचे निदर्शनास आले. कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी हर्षकुमार क्षीरसागर याने बनावट ई-मेल आयडीद्वारे बँकेस उपरोक्त सुविधा पुरविण्याकरिता बनावट पत्र पाठविले.

बँकेने सदर पत्राची कोणतीही खातरजमा केली नाही. तसेच, बँकेत मुळ पत्र नसतांना किंवा विहित नमुन्यातील फॉर्मवर कोणत्याही अधिकाऱ्याची स्वाक्षरी नसतांना नेट बँकिग सुविधा या खात्याकरिता उपलब्ध करून दिली. या खात्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असतांना बँकेने एकदा देखील कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्यास संपर्क केला नाही अथवा सूचना / माहिती दिली नाही. बँकेच्या या निष्काळजीपणामुळे या अफरातफरीची संधी संबंधित कर्मचाऱ्यास मिळाली असल्याचे दिसून आले आहे.

हर्षकुमार क्षीरसागर याने नेट बँकिंगचा वापर करून मोठमोठ्या रकमा त्याचे स्वतःचे एचडीएफसी बँकेतील खात्यात वळत्या केल्याचे दिसून आले.

एफ.आय.आर. दाखल

आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी प्राथमिक तपास करून दि.२१ डिसेंबर २०२४ रोजी या प्रकरणी एफ.आय.आर. दाखल करून घेतला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

यशोदा शेट्टी व त्यांचे पती यांना आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले

दि.२२ डिसेंबर २०२४ रोजी या प्रकरणी यशोदा शेट्टी व त्यांचे पती यांना आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर अद्याप फरार आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/