केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट

परभणी, दि. 30 (जिमाका) – केंद्रीय सामाजिक न्याय  व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज  दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीतील दिवंगत लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. दोन्ही कुटुंबांना शासनाच्यावतीने निश्चितपणे मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

श्री. आठवले यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांकडून त्यांची व्यथा जाणून घेतली. परभणीत घडलेली घटना ही  दुर्दैवी आहे. या प्रकरणाची पारदर्शकपणे सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कार्यवाई करण्यात यावी,  यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  भेट घेणार आहोत.   शासन हे सूर्यवंशी कुटुंबीयांच्या पाठीशी  असून त्यांना सर्वोतोपरी मदत केल्या जाईल. असे  श्री. आठवले यांनी  यावेळी सांगितले.

आंबेडकरी चळवळीतील दिवंगत लोकनेते विजय वाकोडे  यांच्या कुटुंबियांची त्यांच्या राहुलनगर स्थित घरी जावून श्री. आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली. समाजासाठी तळमळीने काम करणारा एक चांगला लोकनेता जिल्ह्याने गमावला आहे. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या स्मारकासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असे श्री. आठवले यांनी याप्रसंगी सांगितले.

दरम्यान, शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत श्री. आठवले यांनी  जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आणि अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्याकडून घटनेचा व याप्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी  दत्तु शेवाळे उपस्थित होते.

0000