गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 29 :-गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यालाही स्पर्धात्मक युगात गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता यावे यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

विविध क्षेत्रात नैपुण्य मिळविलेल्या नाशिक येथील जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि खासगी शाळेच्या विविध 50 विद्यार्थ्याच्या उपस्थितीत मंत्रालयात श्री. भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाचा पदभार स्वीकारला.

शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले की, शालेय शिक्षण विभागाचा केंद्रबिंदू विद्यार्थी असणार आहेत. आनंददायी शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विभाग काम करणार आहे.  राज्यात पहिली ते बारावीपर्यंतचे सव्वा दोन कोटी विद्यार्थी आहेत. एक लाख 8 हजार  शाळा असून 7 लाख 29 हजार  शिक्षक आहेत. विविध उपक्रम योजनांसाठी कृती आराखडा तयार करण्यात येईल. पुढील काही दिवसात शिक्षक, विद्यार्थी, पालक, शैक्षणिक संस्था यांच्याशी चर्चा करून त्यांचे मनोगत आणि अनुभव जाणून घेणार आहे. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात येतील. यासाठी ग्रामस्थ आणि पालकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येईल.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तसेच आरोग्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी विभाग कटिबध्द असल्याचे श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राला शैक्षणिक चळवळीचा वारसा आहे. शिक्षण क्षेत्राला देदिप्यमान परंपरा आहे. पुढेही ही परंपरा कायम राहणार असल्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित विविध 50 विद्यार्थ्यांनी माध्यमांशी संवाद साधला, प्रांजली जाधव या विद्यार्थिनीने महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह महापुरुषांनी स्त्री स्वातंत्र्यासह शिक्षणाचे महत्व पटवून दिले. याची माहिती भाषणातून दिली.

000

श्रद्धा मेश्राम/ससं/