मुंबई, दि. 30 : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सकस आहार पुरवण्यास शासन कटिबध्द आहे. शिक्षण आणि आहार या दोन्हींची गुणवत्ता राखत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
मंत्रालयात पदभार स्वीकारल्यानंतर शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा मंत्री श्री. भुसे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश, 5 वी व 8वी वार्षिक परीक्षा, पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती संदर्भात बदल करणे, विद्यार्थ्यांच्या पटसंख्येबाबत पुनर्रचना करणे, 1 ली ते 10 वी शाळांच्या ऑनलाईन संच मान्यतेबाबत सुधारणा, विशेष मुलांच्या शाळांमधील शिक्षकांची पदनिर्मिती, सैनिकी शाळा, 827 पीएम श्री, 477 आदर्श शाळा, 1 लाख 8 हजार अंगणवाडी यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे, विद्यार्थी केंद्रित सुविधा पुरविणे यावर भर देण्याच्या सूचना मंत्री श्री. भुसे यांनी दिल्या.
या बैठकीस प्रधान सचिव आय. ए.कुंदन, आयुक्त सुरज मांढरे, समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, शिक्षक संचालक योजना महेश पालकर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यासह बोर्डाचे आणि विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. यामध्ये शाळेतील गणवेश, पुस्तके, आहार, अपघात विमा, शैक्षणिक साहित्य, शुल्काची प्रतिपूर्ती, जर्मन भाषा प्रशिक्षण, ई गव्हर्नन्स कार्यक्रम, ‘मुख्यमंत्री – माझी शाळा, सुंदर शाळा’, शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक शाळा, शाळेच्या सुरक्षा इत्यादी विषयांची माहिती घेतली.
0000
श्रद्धा मेश्राम/ससं/