नववर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीयांना अप्रतिम वैज्ञानिक भेट

इस्रोच्या 'स्पॅडेक्स PSLV-C60' यशस्वी मोहिमेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक

मुंबई, दि. ३०:  नववर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारतीयांना अप्रतिम वैज्ञानिक भेट दिली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या  ‘स्पॅडेक्स PSLV-C60’ या महत्वाकांक्षी मोहिमेच्या यशाचे कौतुक करत या संशोधन प्रकल्पात सहभागी इस्रोच्या वैज्ञानिक, अभियंते यांचे अभिनंदन केले आहे.

मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, या मोहिमेमुळे भारताला अंतराळात दोन उपग्रहांच्या दरम्यान ‘डॉकिंग’ ‘अनडॉकिंग’ करण्याची क्षमता प्राप्त होणार आहे. अंतराळातील दोन उपग्रह किंवा उपकरणे जोडून नवीन रचना तयार करण्याच्या या क्षमतेतून भविष्यातील अनेक महत्त्वाचे संशोधन प्रकल्प राबविणे शक्य होणार आहे. यातून जगात अंतराळ संशोधनात अशी मजल गाठणारे भारत चौथे राष्ट्र ठरणार आहे, याचाही भारतीयांना सार्थ अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेला बळ देणारी ही कामगिरी आहे. भारतीय अंतराळ संशोधनाचे अवकाश विस्तारणारी ही कामगिरी आहे. यामुळे भारताच्या अंतराळ संशोधनाच्या शिरपेचात ‘इस्रो’ने मानाचा तुरा रोवला आहे. या मोहिमेत सहभागी इस्रोचे वैज्ञानिक, अभियंते तसेच भारतीय अंतराळ विज्ञान विभागातील सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि यापुढेही या मोहिमेत सुरू राहणाऱ्या विविध प्रयोग, संशोधन प्रकल्पांना हार्दिक शुभेच्छा, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.

000