ठाणे,दि.31(जिमाका):- राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष श्री.जयकुमार रावल यांनी काल, दि.30 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वाशी येथील सुविधांना भेट दिली. या भेटीवेळी पणन व राजशिष्टाचार मंत्री श्री.रावल यांनी सुविधेवर सुरू असलेले कामकाज याबाबतीत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. यावेळी कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक श्री.विनायक कोकरे व सुविधेवर काम करीत असलेले अधिकारी उपस्थित होते.
कृषी पणन मंडळाच्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपियन देश, जपान, न्यूझीलंड, मलेशिया, दक्षिण कोरिया इ. देशांना कृषीमाल निर्यात करण्याकरिता आवश्यक असलेल्या वाशी येथील विकिरण सुविधा केंद्र, उष्ण बाष्प प्रक्रिया केंद्र व भाजीपाला प्रक्रिया केंद्र याबाबतीतील संपूर्ण माहिती सादर करण्यात आली. मंत्री श्री.रावल यांनी याबाबतीत सुरू असलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
या कामकाजाच्या चर्चेवेळी मंत्री श्री.रावल यांनी विकसित देशांची निर्यात कशा पद्धतीने वाढविता येईल याबाबत देखील चर्चा केली. भारत सध्या जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे आपल्याला आपल्यापेक्षा विकसित अमेरिका व चीन या देशांमध्ये कृषीमालाचे मार्केटिंग कशा पद्धतीने केल्या जाते, याबाबतची माहिती प्राप्त करून घेण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचित केले. चीनमधील कृषीमालाच्या लागवडीखालील क्षेत्र हे भारताच्या लागवडीखाली क्षेत्राच्या तीन पट असून तेथे उत्पादित कृषीमालाचे मार्केटिंग कशा पद्धतीत केले जाते, याबाबत देखील अभ्यास करावा अशा सूचना केल्या. अतिदूरवरच्या देशांना समुद्रमार्गे कृषीमाल निर्यात करण्यासंदर्भात प्रोटोकॉल विकसित करण्यात आला असून रशिया येथे केळीची चाचणी कन्साईनमेंट पाठवण्यात आली व ही कन्साईनमेंट यशस्वीरित्या रशिया येथे पोहोचली आहे, अशी माहिती कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक श्री.विनायक कोकरे यांनी दिली. आपल्याला यापेक्षा देखील चांगल्या पद्धतीने कामकाज पुढे नेता येईल, याबाबत विचार विनिमय करण्याबाबत सूचित केले.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारी 2025 च्या सुमारास विविध कृषीमालाचे निर्यातदार व संबंधित घटकांची एकदिवशीय कार्यशाळा मुंबई येथे आयोजित करण्याबाबत पणन व राजशिष्टाचार मंत्री श्री.रावल यांनी सूचित केले आहे.
या बैठकीवेळी विधानपरिषद सदस्य तथा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री.शशिकांत शिंदे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.अशोक डक आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ.पी.एल.खंडागळे व इतर अधिकारी उपस्थित होते.
00000