पणन विभागाने आधुनिक तंत्रज्ञान वापरावे – पणन मंत्री जयकुमार रावल

पणन विभागाची आढावा बैठक

मुंबई, दि.2 : पणन विभागामध्ये मार्केटींगसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कार्यपध्दती राबवण्यावर भर द्यावा, शेतमालाची साठवणूक, वाहतुक व विक्री यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरले पाहिजे, त्यादृष्टीने पुढील काळात नियोजन करण्याचे निर्देश, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पणन विभागाच्या आढावा बैठकीत पणन मंत्री श्री. रावल बोलत होते.

पणन मंत्री श्री.रावल म्हणाले की, केंद्र सरकारने शेतमालाच्या खरेदी विक्रीसाठी देशपातळीवर एक बाजार या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय कृषी बाजार ( ई-नाम) ही योजना सुरू केली आहे .राज्यातील 133 बाजार समित्या ई-नामला जोडण्यात आल्या आहेत .राज्यातील उर्वरित बाजार समित्याही लवकरात लवकर ई-नाम योजनेला जोडण्यात याव्यात. प्रचलित लिलाव पद्धतीमध्ये सुसूत्रता व पारदर्शकता आणून शेतमालास रास्त भाव मिळवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

शेतकरी हा आपल्या राज्याचा कणा असून पणन विभागाच्या माध्यमातून शेतकरी, आडते, व्यापारी, ग्राहक यांचा समन्वय साधून शेतकऱ्यांचे हित कसे जोपासता येईल यावर विभागाने भर दयावा.कृषी उत्पन्न बाजार समित्या या पणन विभागाचे महत्वाचे अंग आहे, त्यादृष्टीने बाजार समित्यांमध्ये शेतकरी पूरक बदल कसे करता येतील याबाबत नियोजन करावे. शेतमालाचे  योग्य त-हेने मार्केटिंग व्हावे, यासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्यासाठी तंत्रज्ञानावर भर ठेवावा. विभागाच्या कायदे व नियम यामध्ये काळानुरूप काय बदल करता येतील का यादृष्टीने विभागाने अभ्यास करावा.शेतमालास आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ मिळण्यासाठीही प्रयत्न व्हावेत.पणन विभागाच्या योजना लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. मॅग्नेट प्रकल्पांचे नांव कृषी पणन प्रकल्प करून त्यांची व्याप्ती वाढविण्यासंदर्भातील सूचनाही श्री. रावल यांनी दिल्या.

या आढावा बैठकीस पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगांवकर, राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अप्पासाहेब धुळाज, पणन संचालक विकास रसाळ, महाराष्ट्र कृषी राज्य पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, मॅग्नेट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे, उपसचिव संतोष देशमुख तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी विभागाच्या कार्यालय प्रमुखांनी आपआपल्या शाखासंदर्भातील विभागाचे सादरीकरण केले.

0000000

दत्तात्रय कोकरे/विसंअ