नाशिक, दि.३ जानेवारी, २०२५ (जिमाका वृत्तसेवा): देशातील शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून सक्षमीकरण होईल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी येथे केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आज सकाळी किसान सुसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, खासदार भास्करराव भगरे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार हिरामण खोसकर, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, आयसीआरचे संचालक डॉ. एस. के. रॉय, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. नितिन ठोके आदी उपस्थित होते. प्रारंभी मंत्री श्री. चौहान यांनी स्वयंसहायता बचत गटांच्या स्टॉलला भेट देत महिलांशी संवाद साधला.
केंद्रीय मंत्री श्री. चौहान म्हणाले की, शेतकरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. प्रत्येक शेतकऱ्यामध्ये आपण देव पाहतो. शेतकऱ्यांची सेवा ही ईश्वर सेवा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून अनेकविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून पीक विमा योजनाचा लाभ तत्काळ मिळण्यासाठी गाव व पंचायत स्तरावर उपग्रह प्रणालीद्वारे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे केली जाणार आहेत. त्यामुळे अचूक प्रक्रिया होवून शेतकऱ्यांना देय भरपाई डी.बी.टी द्वारे त्वरीत प्रदान केली जाईल. शेतकऱ्यांना पिकांचे उत्पादन घेण्यासाठी लागणारी खते ही स्वस्त दरात उपलब्ध करण्यात देण्यात येत आहेत. यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पादीत निर्यातक्षम मालाला योग्य मोबदला व बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीने शासन सकारात्मक आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकरी जास्त आहेत. शेतकऱ्यांना परदेशी द्राक्षांची नवनवीन वाणांची उपलब्धता कशी करता येईल यासाठी बैठकीचे आयोजन करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही केंद्रीय कृषी मंत्री श्री. चौहान यांनी योवळी सांगितले. राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ यशस्वीपणे राबविल्याबाबत केंद्रीय मंत्री श्री. चौहान यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले.
ॲड. कोकाटे म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी प्रयोगशील शेतकरी आहे. येथील शेतकरी नेहमीच नाविन्याचा शोध घेतात, असे सांगत आगामी काळात कृषी विभागातर्फे ड्रोण वापराला प्राधान्य देण्यात येईल. राज्य सरकारतर्फे ऑनलाइन पोर्टल तयार करून ते महसूल विभागाशी जोडून शेतकऱ्यांना मिळणारे अनुदानाची प्रक्रिया सुलभ आणि सुटसुटीत करण्यात येईल. असेही मंत्री श्री. कोकाटे यांनी यावेळी सांगितले. यावेळी जळगाव, ता. निफाड येथील ‘नमो योजनेत’ ड्रोन प्राप्त प्रगतिशील शेतकरी दीपाली मोरे, मधुकर गवळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीमती मोरे, श्री. गवळी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शेतकरी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
0000