राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर

भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळासोबत आढावा बैठक

मुंबई, दि. 7 : राज्यातील प्रत्येक कामगाराचा विकास हा केवळ आर्थिक पातळीवर नाही तर सामाजिक, मानसिक आणि शारीरिक पातळीवरही होण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे कामगारांना आश्वासित करणारे मत राज्याचे कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी व्यक्त केले.

मंत्रालयात कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी भारतीय मजदूर संघ, विदर्भ प्रदेश यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली, त्यावेळी मंत्री श्री. फुंडकर बोलत होते. यावेळी भारतीय मजदूर संघाचे  क्षेत्रीय संघटन मंत्री सी. व्ही.राजेश, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड अनिल ढोमणे, विदर्भ प्रदेश मंत्री रवींद्र गणेशे आणि भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर म्हणाले की, महाराष्ट्र शासनाचे कामगार विषयक धोरण तयार करण्याबाबत  चर्चा करण्यात येईल. तसेच कामगारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार विमा रुग्णालय स्थापन करण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल. असंघटित कामगारांच्या विकासासाठी निधी उभारण्याचे नियोजन असून या निधीच्या माध्यमातून असंघटित कामगारांसाठी विमा, आरोग्य या योजना राबवण्याचे विचाराधीन असल्याचे श्री. फुंडकर यांनी सांगितले.

भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींनी यावेळी निवेदन कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांना सादर केले. कामगारांच्या समस्या, त्यांच्या अडचणी आणि कामगार संघटनांच्या मागण्या, त्यांच्या अंमलबजावणीची स्थिती याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली

0000

मोहिनी राणे/ससं/