नाशिक, दि.13 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा): न्यूक्लिअस बजेट योजनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना अनुदान दिले जाते. या योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात येईल. आगामी काळात लाभार्थ्यांना २ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाईल. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.
महाकवी कालिदास कलामंदिरात मंत्री डॉ. उईके यांच्या उपस्थितीत आदिवासी विकास विभागातील लाभार्थ्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार राजेश पाडवी, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत, उपायुक्त सुदर्शन नगरे, प्रकल्प अधिकारी अर्पित चौहान, अकुनुरी नरेश आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध बचतगट, भजनी मंडळ तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण मंत्री डॉ. उईके यांच्या हस्ते करण्यात आले.
महिला बचतगटांना पुरेसा निधी उपलब्ध करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रकल्प कार्यालयाने वर्षभराचे वेळापत्रक तयार करून लाभ द्यावा. महिला लाभार्थ्यांसाठी तालुकानिहाय बचत भवन उभारावे. त्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी दिला जाईल, असेही मंत्री डॉ. उईके यांनी सांगितले.
कातकरी समाजासाठी स्वतंत्र पॅकेज
कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात स्वतंत्र पॅकेज दिले जाईल. त्या माध्यमातून कातकरी समाजाचे आर्थिक सक्षमीकरण करण्यात येईल. तसेच त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून लाभ दिले जातील, असेही मंत्री डॉ. उईके यांनी सांगितले. दरम्यान, मेळाव्याच्या परिसरात उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेट देत विविध वस्तूंची पाहणी केली. प्रकल्प अधिकारी श्री. चौहान यांनी प्रास्ताविक केले.
भौगोलिक परिस्थितीनुसार योजना कराव्यात : मंत्री नरहरी झिरवाळ
शासनाकडून विविध योजना तयार केल्या जातात. या योजना भौगोलिक परिस्थितीनुसार तयार करण्याची गरज आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे मुख्यालय पुणे येथे आहे. पुण्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या कमी आहे. संशोधनासाठी या संस्थेचे उपकार्यालय नाशिक, धुळे अथवा नंदुरबार येथे सुरू करावे, अशी अपेक्षा अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. झिरवाळ यांनी व्यक्त केली.
कातकरी समाजासह इतर समाजातील लाभार्थ्यांनी स्वानुभव कथन केले. त्यात लता अहिरे यांनी अनुदानामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सोपे झाल्याचे सांगितले. यावेळी शाम गावित, नवनाथ कोळी यांनी मनोगत व्यक्त केले.