मुंबई, दि. १५ : राज्य शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र क्रीडा असोसिएशन यांनी बारामती येथे संयुक्तपणे आयोजित केलेल्या २३ व्या ‘छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे’ चे उद्घाटन आज सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभावेळी, स्पर्धेत सहभागी खेळाडू, मार्गदर्शक, प्रशिक्षक, कबड्डी रसिकांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आयोजित होणाऱ्या कबड्डी, खोखो, कुस्ती आणि व्हॉलीबॉल या चार राज्यस्तरीय स्पर्धांसाठी दिले जाणारे ७५ लाख रुपयांचे अनुदान वाढवून ते एक कोटी करण्याची घोषणा केली.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या या घोषणेमुळे देशी खेळांच्या प्रचार-प्रसार आणि खेळाडूंच्या विकासाला अधिक बळ मिळणार आहे. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या या घोषणेचे क्रीडा जगतातून स्वागत होत आहे.
—००००–