शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिविशेषोपचार रुग्णालयाचे लोकार्पण

अवयव प्रत्यारोपण सुविधेसह सर्व सुविधा उपलब्ध करणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

घाटीच्या विकासासाठी एकत्रित निधी देणार – पालकमंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर, दि.१९(जिमाका)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि संलग्न रुग्णालयात गोरगरीब रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. त्यांना उत्तम उपचार सुविधा देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयात अवयव प्रत्यारोपण सुविधांसह सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील,असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे दिले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (घाटी रुग्णालय) सर्व सुविधांचा विकास करणे ही आमची जबाबदारी असून पालकमंत्री म्हणून सर्व कामांसाठी एकत्रित निधी देणार,अशी घोषणा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज अतिविशेषोपचार रुग्णालयाचे उद्घाटन  व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकांसाठी करावयाच्या सुविधांचे भुमिपूजन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर बजाज शैक्षणिक संकुलात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) आयुष, आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालय प्रतापराव जाधव हे दुरदृष्य प्रणालीने या कार्यक्रमात सहभागी होते. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड, विधान परिषद सदस्य आ. सतिष चव्हाण, आ. विक्रम काळे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, विशेष कार्य अधिकारी डॉ. वैशाली उणे आदी उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण विभागाचे काम रुग्णांना सेवा देतांनाच समाजासाठी चांगले डॉक्टर्स घडविणे हे सुद्धा आहे. त्यामुळे चांगली रुग्णसेवा देतांनाच दर्जेदार शिक्षण देण्याचे काम या विभागामार्फत होत असते. मेरीट मध्ये आलेले विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. त्यांना शिक्षणाची, रहिवासाची चांगली सुविधा उपलब्ध करण्यात येते. याशिवाय येणारे गोरगरीब रुग्णांना दर्जेदार सेवा देणे हे सुद्धा आमचे कर्तव्य आहे. संलग्नित खाजगी व धर्मादाय रुग्णालयात योजनांद्वारे आर्थिक मदत देऊन उपचार दिले जातात. असे असले तरी रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी शासकीय रुग्णालये बळकट करण्याचे आमचे धोरण आहे. येत्या वर्षभरात शासकीय रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपणासारख्या उपचार सुविधांसोबत सर्व सेवा देण्यात येतील,असे नियोजन आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक गोरगरीब रुग्णाला चांगली सेवा द्या. गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा आहे,असे मुश्रीफ यांनी सांगितले.

पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्सच्या सुविधांकडे अधिक लक्ष पुरविण्यात येईल. या शहराचे वैभव आणि ओळख असलेल्या या रुग्णालयात सुविधा देण्याची जबाबदारीही पालकमंत्री म्हणून आपली आहे. तेव्हा अधिकाधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी एकत्रित निधी देण्याचा प्रयत्न करु. रुग्णालयात आणि महाविद्यालयात लोकप्रतिनिधी, रुग्ण, समाजसेवक अशा सगळ्यांशी सुसंवाद व्हावा व त्यासाठीही प्रयत्न व्हावेत,असे निर्देशही त्यांनी दिले.

खा. डॉ. भागवत कराड व वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर  यांनीही आपेल मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. अर्चना दरे यांनी तर डॉ.वैशाली उणे यांनी आभार मानले.

०००००