प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक- उपमुख्यमंत्री अजित पवार

जालना,(जिमाका)दि.२० : आज प्रत्येक व्यक्तीला आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रचंड धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

 येथील स्थानिक हॉस्पीटलच्या लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार हे बोलत होते. यावेळी सर्वश्री आमदार अर्जून खोतकर, कल्याण काळे, विक्रम काळे, सत्यजीत तांबे, मनोज कायंदे, डॉ. राजीव डोईफोडे, माजी आमदार राजेश टोपे, अरविंद चव्हाण, सतिष चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, एखादी व्यक्ती जर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट असेल तरच त्या व्यक्तीला निरोगी म्हटले जाते. सद्या वाढत असलेल्या विविध आजार, बदलती जीवनशैली यामुळे कोणत्याही वयोगटातील लोकांना कोणतेही आजाराला सामोरे जावे लागत आहे. तसेच सर्वांनी व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. त्याकरीता सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या आरोग्याची कशाप्रकारे घेतात याचे देखील यावेळी उदाहरण दिले. आरोग्याच्या सुविधा देणाऱ्या या वास्तुमुळे जालना शहराच्या वैभवात भर पडली आहे. नागरिकांना विविध आजारांच्या अत्याधुनिक आरोग्य सुविधा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने अलीकडे अनेक तज्ज्ञ डॉक्टर हे एकत्र येवुन हॉस्पिटल सुरु करुन आरोग्य सेवा देत आहेत. राज्य शासन सर्वांसाठी आरोग्य मिशन घेवून पुढे जात आहे. यामाध्यमातूनच राज्य शासनाने देखील बहूतेक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु केले आहेत. यामुळे नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे सांगुन, आज लोकार्पण होत असलेल्या हॉस्पिटलला त्यांनी पुढील वाटचाली करीता यावेळी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार अर्जून खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील बॅरेजेस, जीएसटी आदी विविध प्रश्न मांडून, जिल्ह्यासाठी ज्या मागण्या केल्या त्याबाबत बैठक आयोजित करुन, सदर प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.