डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे येथील स्मारकाचा आराखडा तातडीने पाठवावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. 22 :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे या मूळ गावी होत असलेल्या त्यांच्या स्मारकाचे काम लवकर सुरू होण्यासाठी  सामाजिक न्याय  विभागाने स्मारक आराखडा  तातडीने पाठवावा.  हा आराखडा तयार करताना  टप्पा एकमधील कामे व टप्पा दोनमध्ये  घेण्यात येणारी कामे  असा आराखडा  तयार करावा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी आंबडवे, ता. मंडणगड,  जि. रत्नागिरी येथील स्मारक कामासंदर्भात बैठक झाली. बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, माजी खासदार अमर साबळे, प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, उपसचिव अजित देशमुख, सह सचिव श्री. बागुल, अवर सचिव श्रीमती देशमुख यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते. तर कोकण विभागीय आयुक्त  व रत्नागिरीचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले,  स्मारकासाठी खासगी जागा भूसंपादन प्रक्रिया सुरू करावी. भूसंपादन आणि स्मारकाच्या संपूर्ण कामासाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव द्यावा. स्मारकाची कामे टप्प्याटप्प्याने सुरू करावीत. स्मारक जागेमध्ये येणाऱ्या खासगी घरांना देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाचा प्रस्तावाच्या आराखड्यात समावेश करावा, अशा सूचनाही  श्री. बावनकुळे यांनी दिल्या.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ