गडचिरोली, (जिमाका) दि.22 : राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज गडचिरोलीत प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेताना जिल्ह्यातील विकास कामांना गती देत त्या पूर्ण वेगाने पुढे नेण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी कोणतीही विकास कामे प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी व विकासकामांमध्ये अडथळे येत असल्यास आपल्याशी थेट संपर्क साधण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल प्रामुख्याने उपस्थित होते.
श्रीमती सौनिक यांनी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रशासकीय कामकाज जलद गतीने पार पाडण्याचे सूचना देतांनाच गडचिरोलीला डिजिटल जिल्हा म्हणून विकसित करण्याचे सांगितले. त्यांनी शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा पॅनेल बसवून ऊर्जा बचत करण्याच्या सूचना दिल्या. कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी एक पीक पद्धतीऐवजी द्विपीक किंवा बहुपीक पद्धती अंगीकारण्याचे व फळझाड लागवडीला प्रोत्साहन देण्याच्या सूचना दिल्या.
स्थानिक आयटीआयमधील विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील उद्योगांमध्ये प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्याचे व त्यात किमान 30 टक्के महिलांना रोजगाराची हमी दिली जाईल, याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पेसा कायद्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कायद्यात सुधारणेचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
स्थानिक स्तरावर ज्या अडचणी सुटू शकत नाही त्याची यादी माझ्याकडे पाठवावी मी त्या सोडविण्यासाठी 100 टक्के प्राधाण्य देईल याबाबत त्यांनी आश्वस्त केले, यासोबतच विकासकामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देत तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तत्परतेने काम करण्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील विकास कामांची माहिती दिली.
मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी गोंडवाना विद्यापीठातील सीआयआयआयटी प्रशिक्षण केंद्र व एकल सेंटरलाही भेट देवून पाहणी केली. डिजिटल कारपेंट्री युनिट व ई-बायसिकल उत्पादन युनिटची उभारणी करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासोबतच रोजगाराच्या संधींना चालना देण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
0000