ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

दावोस, दि. 23 : – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांच्या निधनाने सामूहिक वनहक्क, पर्यावरण तसेच ग्रामस्वराज क्षेत्रात हिरीरीने काम करणारे एक महनीय व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले आहे. या क्षेत्रात त्यांची पोकळी कायम जाणवेल, अशा शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील लेखा-मेंढा या राज्यातील पहिल्या ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ या कल्पनेला मूर्तरूप देण्याचे काम त्यांनी केले. मोहन हिराबाई हिरालाल यांनी गावकऱ्यांमध्ये जंगलावरील यांच्या कायदेशीर हक्काबद्दल जागृती निर्माण केली. त्यामुळे वन व्यवस्थापन लोकप्रिय करण्यात मदत झाली. त्यांच्या प्रयत्नामुळे मेंढा (लेखा) व मर्दा या गावांत त्यांनी मोठी चळवळ उभी केली. गडचिरोली जिल्ह्यात वृक्षमित्र या संस्थेची स्थापना करून वन व पर्यावरण ग्रामस्वराज्य संकल्पनेसाठी त्यांनी निस्वार्थपणे आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जमनालाल बजाज फाऊंडेशनचा पुरस्कारही त्यांना मिळाला. महाराष्ट्र ग्रामराज्य अधिनियमाअंतर्गत लेखा-मेंढा हे ग्रामदान गाव म्हणून घोषित झाले. हे देशातील पहिले गाव ठरले. स्वता:च्या नावासामोर आईचे नाव लावून त्यांनी फार पूर्वीच मातृशक्तीचा सन्मान केला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.