मुंबई, दि. 23 : राज्यातील परिवहन महामंडळाच्या बसेसचे होणारे अपघात कमी करण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्यात यावीत. राज्यातील सर्व बस स्थानकांवर तृतीयपंथीयांना राखीव स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे. तसेच बस स्थानक परिसर स्वच्छ व उत्तम सोयी सुविधायुक्त ठेवण्यात यावा, असे निर्देश परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.
एसटी महामंडळाच्या आढावा बैठकीचे आयोजन राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. बैठकीला परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख, महाव्यवस्थापक नंदकुमार कोळकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी महामंडळाच्या बसचे होणारे अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सूचना देत प्रवाशांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा आणि बसचे वाहक व चालक यांच्या मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या.
यासोबतच निवासस्थान प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचनाही दिल्या. बसस्थानक व लोकांना उत्तम सुविधा व सुरक्षित प्रवासासाठी आगामी काळात विविध उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
—
नीलेश तायडे/विसंअ/