नंदा मुंदे यांना सेंद्रिय शेतीतील ‘जैविक इंडियन’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

मुंबई, दि.23 : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयं सहाय्यता गटात सदस्य असलेल्या भामदेवी ता. कारंजा जि. वाशिम येथे कृषी सखी म्हणून कार्यरत असलेल्या नंदा संतोष मुंदे यांना  सेंद्रिय शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचे उत्पादन आणि लक्षवेधी नफा मिळवल्याबद्दल नुकताच इंटरनॅशनल कॉम्पिटन्स सेंटर फॉर ऑरगॅनिक ॲग्रीकल्चर या  (ICCOA) राष्ट्रीय स्तरावरील जैविक इंडियन हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

सेंद्रिय शेतीमध्ये क्रांतिकारक कार्य केल्यामुळे आणि कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊन मोठ्या प्रमाणात नफा मिळवल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रुपये 50 हजार आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे नंदाताई मुंदे करत असलेली शेती ही सेंद्रिय शेती प्रकल्प  प्रमाणीकरण प्राप्त आहे.

2022 ते 2024-25 या वर्षामध्ये ताईंनी सोयाबीन, तूर, गहू, हरभरा या पिकांचे दोन एकर क्षेत्रामध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती केली. एकूण 26 हजार रुपयांच्या भांडवलात ताईंनी ही सेंद्रिय शेती केली त्यातून 22 क्विंटल सोयाबीन, 8 क्विंटल तुरीचे उत्पादन घेतले. या उत्पादनातून सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून ताईंनी एकूण 1,45,624 रुपये नफा मिळवला आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर आणि मुख्य संचालन अधिकारी यांनी अभिनंदन केले.

००००

संध्या गरवारे/विसंअ/