मुंबई, दि.23 : राज्यातील शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया उद्या (दि.24 जानेवारी) पासून सुरु करण्यात येणार आहे. तूर खरेदी केल्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळण्याची प्रक्रिया जलदगतीने करावी. तसेच नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी. असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.
हमी भावाने 300 केंद्रावरून तीन लाख मेट्रीक टन तूर खरेदी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे तूर खरेदी प्रक्रिये संदर्भातील आढावा बैठक झाली. बैठकीस एन.डी.श्रीधर दुबे पाटील, कार्यकारी संचालक (मार्फेड), भाव्या आनंद, राज्यप्रमुख (नाफेड),प्रशांत बसवकर, उपव्यस्थापक, एमएसडब्लुसी, डी.आर.भोकरे, व्यवस्थापक(मार्फेड) यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
‘नाफेड’ अंतर्गत महाराष्ट्र मार्केटींग फेडरेशन तसेच विर्दभ मार्केटींग फेडरेशन या दोन संस्थांच्या माध्यमातून तूर खरेदी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
पणन मंत्री श्री. रावल म्हणाले की, राज्यभरात सुरवातीला तीनशे खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना विनाअडथळा तूर खरेदी नोंदणीची तांत्रिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यात तांत्रिक अडचण येणार नाही याची काळजी यंत्रणेने घ्यावी. वेअर हाऊसिंग कार्पोरेशनने खरेदी प्रक्रियेतील काम जलद गतीने पूर्ण करून शेतकऱ्यांना पेमेंट जमा करण्यास अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. याकामी अधिकचे मनुष्यबळ लागत असल्यास त्याची व्यवस्था करावी. त्याचसोबत खरेदी केंद्रांवर शेतकऱ्याना पाण्याची,बसण्याची सुयोग्य व्यवस्था, तक्रार निवारण केंद्राची सुविधा उपलब्ध करावी. याठिकाणी शेतक-यांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची कटाक्षाने खबरदारी घ्यावी. जिल्हा मार्कैटिंग अधिकारी यांनी या सर्व बाबींचे नियंत्रण करुन तक्रारींचे निवारण करावे. तूर खरेदीच्या दृष्टीने वेअर हाऊसची नियोजन व्यवस्था तयार ठेवावी. त्यासाठीची आवश्यक ती निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी. त्याठिकाणी डेटा एन्ट्री व्यवस्था शेतक-यांच्या प्रतिसादानुसार आवश्यक प्रमाणात ठेवण्यात यावी. शेतक-यांनी डेटा एन्ट्री केल्या नंतर पुढच्या 72 तासात नाफेड मार्फत नियमानुसार त्यांना पैसे प्राप्त होतील, याची काळजी घ्यावी. खरेदी नोंदणीची तसेच खरेदी सुरु झाल्यानंतर त्या बाबतची प्रक्रिया गतीने सुव्यवस्थितरित्या पार पाडण्याच्या सूचना यावेळी पणन मंत्री श्री.रावल यांनी दिल्या.
०००
वंदना थोरात/विसंअ