मुंबई, दि. 23 : महाराष्ट्रामध्ये झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय मतदान दिन 2025 चे औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, एम.आय.टी. विद्यापीठ, पुणे आणि जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे राज्यस्तरीय पुरस्कार शनिवार, 25 जानेवारी 2025 रोजी स्वामी विवेकानंद सभागृह, एम.आय.टी. कोथरूड, पुणे येथे प्रदान केले जाणार आहेत.
या कार्यक्रमास राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीसाठी सुकाणू समितीचे अध्यक्ष प्रो.नितीन करमळकर, ऑलिम्पिक महिला नेमबाज तथा सदिच्छादूत राही सरनोबत, भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव, एव्हरेस्टवीर उमेश झिरपे, अंतराळ उद्योजक श्वेता कुलकर्णी, सदिच्छादूत श्रीगौरी सावंत, तृतीयपंथी छायाचित्र पत्रकार झोया लोबो, अमुक-तमूक यूट्यब चॅनेलचे ओंकार जाधव व सावनी वझे आणि खास रे टी.व्हीचे संजय कांबळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
राष्ट्रीय मतदान दिनानिमित्तच्या या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान कार्यक्रमाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर मतदार जागृती दालन, सेल्फी पॉईंट, मतदार जागृती खेळ आणि पथनाट्याचाही समावेश करण्यात आला आहे. 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना मतदार ओळखपत्राचे वाटप कार्यक्रमाबरोबरच शपथ देण्याचा कार्यक्रम होणार आहे.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकसभा तसेच विधानसभा 2024 मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी, टपाली मतपत्रिकांची देवाण-घेवाण करण्याचे नियोजन, मतदान साहित्य वाटप करून घेण्याचे नियोजन, मतदार सुविधा, वार्तांकन पुरस्कार आणि शासकीय भागीदारी यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम तसेच अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी यांनी कळविले आहे.
000
संजय ओरके/विसंअ