पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून शासकीय विभागांचा आढावा
सोलापूर, दिनांक 23(जिमाका):- शासनाने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू केलेल्या असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची आहे. त्यामुळे या प्रशासकीय यंत्रणेने सर्वसामान्यांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा तसेच यंत्रणेकडे येणारी कामे त्वरित मार्गी लावावीत, असे आवाहन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
नियोजन भवन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सर्व विभागांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल उगले तेली, आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार सर्वश्री राम सातपुते, रवींद्र राऊत, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसात सात सुत्री कार्यक्रमाची उद्दिष्टपूर्तता करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व सर्व प्रशासकीय यंत्रणेने आपली जबाबदारी ओळखून कामे पूर्ण करावीत. या अंतर्गत सर्वसामान्यांना विविध सोयी सुविधा देण्याबरोबरच कार्यालयाची स्वच्छता करावी. तसेच ही स्वच्छता मोहीम राबवत असताना सर्वसामान्य नागरिकांना चांगली वागणूक देऊन त्यांची कामे त्वरित मार्गी लावण्याच्या दृष्टीने अधिकारी- कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या मनाची स्वच्छता ही केली पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना त्या त्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी कशा पद्धतीची वागणूक देतात याची माहिती मिळण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयात व्हाईस सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा बसवावी, त्यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येईल. तसेच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची कशा पद्धतीने वागावे याबाबत सर्व अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण द्यावे. प्रत्येक कार्यालयात स्वच्छता कशा पद्धतीने ठेवली जात आहे तसेच सर्वसामान्य नागरिकांची त्या कार्यालयांचा व्यवहार कशा पद्धतीचा आहे याची माहिती आपण त्या त्या शासकीय कार्यालयात पुढील काळात अचानक भेट देऊन माहिती घेणार असल्याचे पालकमंत्री श्री. गोरे यांनी सांगितले.
केंद्र व राज्य शासन हे दूरदृष्टी असलेले शासन असून सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व प्रकारचे सहकार्य मिळणार आहे. पुढील काळात सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यवसाय वाढतील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत तसेच येथे येणाऱ्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही यासाठी प्रशासनाने ही योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच प्रशासकीय यंत्रणेने लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावेत. तसेच लोकप्रतिनिधी घेऊन आलेले प्रश्न, कामे विहित पद्धतीने पूर्ण करावीत. लोकप्रतिनिधी यांना सन्मान द्यावा असेही पालकमंत्री गोरे यांनी सुचित केले.
सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारी सोलापूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजना ही खूप मोठी योजना असून या योजनेचे 90% पेक्षा अधिक काम झालेले दिसून येत आहे. तरी पाणी पंपिंग करण्यासाठी लागणारी वीज ही सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू. हा सौर ऊर्जा प्रकल्प झाल्यास महापालिकेचे दरमहा लाखो रुपयांची वीज बचत होऊन हा निधी विकास कामांना वापरणे शक्य होणार असल्याचे पालकमंत्री श्री. गोरे यांनी सांगितले. तसेच जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका व अन्य संबंधित विभागाचे विकास कामासाठी शासन स्तरावर प्रलंबित असलेले सर्व प्रश्नांची सोडवणूक सर्वांच्या सहकार्यातून लवकरात लवकर करण्यास आपले प्राधान्य राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादरीकरणाद्वारे सोलापूर जिल्ह्याची सर्वसाधारण माहिती सांगितली. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेले विविध योजना प्रकल्प याची माहिती दिली. त्याप्रमाणेच मुख्यमंत्री महोदयांचा शंभर दिवसात उद्दिष्ट पूर्तता कार्यक्रम याची सविस्तर माहिती दिली. सोलापूर विमानतळ विषय सविस्तर माहिती देऊन माहे मार्च 2025 मध्ये येथून प्रवासी विमान वाहतूक सुरू होऊ शकते असे त्यांनी सांगितले. महापालिका आयुक्त श्रीमती तेली यांनी सोलापूर महापालिकेची सविस्तर माहिती दिली. तर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती बैठकीत दिली.
शहरातील राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना पालकमंत्री यांनी केले वंदन
राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असताना सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, धर्मवीर संभाजी महाराज पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा, चार हुतात्मा पुतळा येथे जाऊन त्यांना पुष्पहार अर्पण करून वंदन केले.