मुंबई, दि. २४ : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाहीवर निष्ठा व्यक्त करण्यासाठी मंत्रालयातील उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांना अपर मुख्य सचिव (महसूल) राजेश कुमार यांनी शपथ दिली.
शनिवार दि.२५ जानेवारी रोजी शासकीय सुट्टी असल्याने दि.२४ जानेवारी रोजी शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंत्रालयात या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास सचिव तथा अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, मुख्य सचिव कार्यालयाच्या सह सचिव स्मिता निवतकर यांच्यासह सामान्य प्रशासन विभाग व मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक तथा सूत्र संचालन, सहायक मुख्य निवडणूक अधिकारी किरण शार्दूल यांनी केले.
सन २०११ पासून, राष्ट्रीय मतदार दिवस हा २५ जानेवारी रोजी साजरा केला जाणारा वार्षिक कार्यक्रम आहे, जो भारतीय निवडणूक आयोगाच्या (२५ जानेवारी, १९५०) स्थापना दिनासोबत आहे. या महोत्सवाचा दुहेरी उद्देश नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि नवीन, पात्र तरुणांना मतदार म्हणून नावनोंदणी करण्यात मदत करणे असा आहे.
००००
राजू धोत्रे/विसंअ/
000