मुंबई, दि. २४ : धडाडीचा पत्रकार या व्याख्येत बसणारा, पत्रकारांच्या तीन पिढ्यांचा कृतीशील मार्गदर्शक हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे.
‘ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून दीर्घकाळ अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत राहीले. साहित्य, राजकारण, संगीत आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचा धडाडीचा सहभाग राहीला. प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचून वृत्तांकन करण्याची त्यांची धडाडी होती. पुण्यातील पत्रकारिता, संघटन तसेच राष्ट्रीयस्तरावरील नेतृत्व यांसह सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे ठरले. माणूस केंद्रबिंदू मानून त्यांनी पत्रकारिता केली. समाजातील वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी लेखणी चालविली. पत्रकारांच्या तीन पिढ्या घडवितांना तरूणाईत विचारांचे बीजारोपण महत्त्वाचे हे सातत्याने सांगितले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.